
अमजद खान
पावसामुळे मुंबई आणि परिसरात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत ही पाऊसांने सर्वांची तारांबळ उडवून दिली आहे. त्यात उल्हासनगरमध्ये तर पावसाने भरतनगरमध्ये भयंकर स्थिती निर्माण झाली होती. उल्हासनगर शहरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. सरासरी 118 मिलिमीटर पावसाची नोंद शहरात झाली आहे. त्याचा फटका शहरातल्या अनेक भागांना बसला आहे.
शहरातल्या कानसई रोडवरील भरत नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अंदाजे 170 घरांमध्ये पाणी शिरले होते. या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाचे जवान, प्रभाग समिती क्र. 4 चे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिका कर्मचारी यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर प्रभावित रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे तात्पुरता का होईना त्यांना दिलासा मिळाला.
नक्की वाचा - Dombivali Rain: पावसाचा दणका! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात कंबरेपर्यंत पाणी
या सर्वांना जवळील महापालिकेचे समाज मंदिर व बुद्ध विहार येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. येथे सुमारे 500 नागरिकांसाठी चहापाणी व नाश्त्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी यावेळी प्रखर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की,दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. पावसाचे पाणी नाल्यातून घरात शिरते, मोठे नुकसान होते. मात्र पालिका आणि आमदार फक्त पाहणीपुरतेच येतात. त्यामुळे स्थानिकांनी संपातप व्यक्त केला आहे.
यावेळी नागरीकांनी प्रशासन आणि लोक प्रतिनिधींना जबाबदार धरलं आहे. पाणी दरवर्षी घरात येते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही.नागरिकांनी महापालिकेवर गंभीर आरोप करताना सांगितले की, नुकसान भरपाईचे फॉर्म निघतात, पण ज्यांचे खरे नुकसान झाले त्यांना मदत मिळत नाही. उलट इतरांना नुकसान भरपाई दिली जाते. स्थानिकांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तातडीने पूरनियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world