Mumbai News: आर्थिक संकट आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून मुंबईतील एका 51 वर्षीय कापड व्यापाऱ्याने वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. भावेश नवीनचंद्र मजेठिया असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी भावेश यांनी प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
'मळमळत असल्याचा' बहाणा केला
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश मजेठिया यांचे घाटकोपर येथे कपड्यांचे दुकान आणि दादर येथे कार्यालय होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर जातो असे सांगून घरातून निघाले होते. ते आधी घाटकोपरच्या दुकानात गेले, तिथून लोकल ट्रेनने दादरला पोहोचले आणि टॅक्सी पकडून सिद्धिविनायक मंदिरात गेले.
(नक्की वाचा- Mysterious Blue Hole: खोल समुद्रात सापडलं 3200 वर्ष जुनं अनोखं विश्व; शास्त्रज्ञही झाले चकीत!)
सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी वांद्रे येथे जाण्यासाठी दुसरी टॅक्सी पकडली. टॅक्सी सी लिंकवर पोहोचली असता, त्यांनी चालक अहमद यांना "मला मळमळ होत असून उलट्या करायच्या आहेत" असा बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितले. टॅक्सी थांबताच भावेश यांनी आपला मोबाईल आणि बॅग गाडीतच सोडली, तात्काळ खाली उतरून समुद्रात उडी घेतली.
लाटांमुळे बचावकार्यात अडथळा
टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाने वरळी पोलिसांना अलर्ट केले. पोलिसांनी स्थानिक कोळी बांधव आणि मुंबई सागरी पोलिसांना पाचारण केले. मात्र, समुद्र अत्यंत खवळलेला असल्याने आणि लाटांची तीव्रता जास्त असल्याने कोळ्यांच्या आणि सागरी पोलिसांच्या बोटींना वरळी सी फेसपर्यंत पोहोचणे अशक्य झाले. त्यांना दीपगृहाजवळच थांबावे लागले.
(नक्की वाचा- VIDEO: भयंकर! धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)
शेवटी, वरळी पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबई अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशामक दलाच्या जवानांनी हवेने फुगवल्या जाणाऱ्या विशेष 'इन्फ्लेटेड रबर बोटी' समुद्रात उतरवल्या आणि अथक प्रयत्नांनंतर भावेश यांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
व्यवसायात मोठे नुकसान
पोलिसांनी मजेठिया यांच्या मुलाचा आणि कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार, भावेश मजेठिया यांच्यावर बाजारातील अनेक बँकांचे आणि व्यक्तींचे कर्ज होते. गेल्या 6 महिन्यांपासून कपड्यांच्या व्यवसायात त्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला होता, ज्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. ते फोन उचलत नसल्याने कुटुंबीय त्यांना सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला फोन उचलून या दुर्घटनेची माहिती कुटुंबाला दिली. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world