केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील आपल्या प्रचारसभा रद्द केल्या आहेत आणि तातडीने दिल्ली परतले आहेत. मणिपूरमधील अस्थिर परिस्थिती पाहता गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेऊ शकतात.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितलं की, अमित शाह यांना परत जावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी निराशा आहे, पण त्यांना कर्तव्यावर जावे लागले आहे. अमित शाह यांच्या 4 सभांपैकी 2 स्मृती इराणी करणार तर 2 शिवराजसिंह चौहान करणार आहेत. तुर्तास कोणतीही सभा रद्द झालेली नाही.
मणिपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती
मणिपूरमध्ये, शनिवारी रात्री इम्फाळ खोऱ्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संतप्त जमावाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आणखी तीन आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरांना आग लावली. तसेच, सुरक्षा दलांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या वडिलोपार्जित घरात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
महाराष्ट्रातील भाजपच्या प्रचाराचा एक भाग म्हणून शाह काही निवडणूक रॅलींमध्ये सहभागी होणार होते. मात्र त्यांनी त्या रॅली रद्द करून अमित शाह दिल्लीला परतले आहेत. त्यांच्या रॅली रद्द करण्याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र मणिपूरमधील अस्थिर परिस्थितीमुळे असा निर्णय घेतला असावा.
केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचे आकलन करेल आणि परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारला मदत करेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हिंसाचाराच्या ताज्या घटनानंतर राज्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संतप्त जमावाने सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कोंथुजम यांच्या निंगथोखाँग येथील निवासस्थानावर, लँगमेडोंग बाजारातील ह्यंगलामचे भाजप आमदार वाय राधेश्याम, थौबल जिल्ह्यातील वांगजिंग टेंथाचे भाजप आमदार पी. ब्रोजेन आणि खुंद्रकपाम पूर्व येथील काँग्रेसचे आमदार थोकचोम लोकेश्वर यांच्या घरांवर हल्ला केला.
रविवारी सकाळी इम्फाळ खोऱ्यातील पाचही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण होती. जिरीबाममध्ये सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर झालेल्या हिंसक निदर्शनानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world