
वाढवण बंदर आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉरने जोडलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे हा मार्ग जोडला जाईल. या द्रुतगती महामार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येईल. प्रकल्पाकरता हूडकोकडून 1 हजार 500 कोटींचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह 2 हजार 528 कोटी 90 लाख रुपयांच्या तरतूदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचे काम 3 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
वाढवण ट्रान्सशिपमेंट हे बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून बांधले जात आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व किफायतशीर किंमतीमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. हे पाहाता हे बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव आहे. केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते तवा पर्यंत 32 कि.मी. महामार्गाचे काम हाती घेतले आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
समृध्दी महामार्गावरुन वाढवण बंदराकडे जाण्याकरीता भरवीर-आमणे (समृध्दी महामार्ग) ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जवळजवळ 82 कि.मी. लांबीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो. वाढवण बंदराच्या भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयुक्त अशा महामार्गाची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. हा शिघ्रसंचार द्रूतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे.
नक्की वाचा - Mumbai News: श्रीमंत महापालिकेची शाळा 1 महिन्यापासून बंद, 2 हजार विद्यार्थी वाऱ्यावर
या महामार्गामुळे तवा भरवीर हे वडोदरा- मुंबई एक्सप्रेस मार्गे अंतर समृद्धी महामार्ग 183.48 किमी ऐवजी 104.898 किमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या अंतरात 78.582 किमी बचत होणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सद्याच्या 4 - 5 तासावरून साधारणतः 1 ते 1.5 तासावर येईल. यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. दळणवळण गतीमान झाल्याने पालघर, नाशिक जिल्ह्यांमधील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्रांना याचा लाभ होणार आहे. यातून स्थानिकांना उत्तम रोजगार व उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world