Palghar News: वसईत जेष्ठ शिवसैनिकाचा अपघाती मृत्यू; ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

Palghar News: शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावरील शिरसाड नाका परिसरात हायवा ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पारोळ गावचे उद्योजक आणि ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र गोपाळ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर धावणाऱ्या अवजड आणि अनियंत्रित वाहनांमुळे पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. शिरसाड नाका परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या रस्ते अपघातात पारोळ गावातील प्रसिद्ध उद्योजक, शेतकरी आणि ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र गोपाळ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण वसई आणि पारोळ परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.

अचानक वळण घेतल्याने दुचाकी आली चाकाखाली

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र पाटील हे शुक्रवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून पारोळ गावाहून शिरसाडच्या दिशेने काही वैयक्तिक कामासाठी जात होते. ते शिरसाड नाका परिसराजवळ पोहोचले असता, त्यांच्या पुढे जाणाऱ्या एका वेगवान हायवा टिपिंग ट्रकने इंडिकेटर न देता अचानक डावीकडे वळण घेतले.

Advertisement

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

ट्रक अचानक आडवा आल्याने रवींद्र पाटील यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट हायवा ट्रकच्या मागील अवजड चाकाखाली गेली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने रवींद्र पाटील यांचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रक चालकाला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

(नक्की वाचा-  प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम)

ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश

या अपघातानंतर शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरून रात्रंदिवस धावणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त रेती आणि खडी वाहून नेणाऱ्या हायवा गाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खराब होत असून चालकांच्या बेदरकारपणामुळेच रोज अपघात होत आहेत, त्यामुळे अशा गाड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
 

Topics mentioned in this article