Mumbai News: डोक्यात कोयता अडकला कसा? तरुणाने सांगितला हल्ल्याचा थरार, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Mumbai News: मुंबईच्या मानखुर्द परिसरात रोहित पवार नावाच्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेतील रोहितचा सायन रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, मुंबई

मुंबईतील सायन रुग्णालयातील एका व्हिडिओने संपूर्ण मुंबई हादरली होती, ज्यामध्ये एका तरुणाच्या डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेत तो उपचारासाठी उभा होता.  रोहित पवार नावाच्या या तरुणाने आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा थरार कथन केला आहे. रोहित आणि त्याचे वडील नागनाथ पवार यांनी या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कोयता डोक्यात अडकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तो पाहून कोणाचाही थरकाप होईल. डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेत एक तरुण उपचारासाठी उभा असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. रोहितवर मानखुर्द परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. 

Advertisement

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

जुन्या वादातून सूड? 

रोहित पवारने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला असण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबर 2025 मध्ये मानखुर्द भागातील 'दत्ता' नावाच्या मुलाशी रोहितचे किरकोळ भांडण झाले होते. त्यावेळी दत्ताने रोहितवर मागून बांबूने हल्ला केला होता, ज्यामध्ये रोहितला 6 टाके पडले होते. याप्रकरणी रोहितने मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि सध्या दत्ता तुरुंगात आहे.

दत्ता तुरुंगात गेल्याचा बदला घेण्यासाठी त्याचा मित्र 'गौतम' याने हा प्राणघातक हल्ला केला असावा, अशी शंका रोहितने व्यक्त केली आहे.

आरोपींना 'बेल' नको, जेलच हवी!

या भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या रोहित पवार आणि त्याचे वडील नागनाथ पवार यांनी राज्य सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. "आरोपींवर अशी कारवाई करा की त्यांना सहजासहजी जामीन मिळता कामा नये. सामान्य नागरिकांनी सुरक्षित जगावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे," अशी मागणी पवार कुटुंबीयांनी केली आहे.

(नक्की वाचा-  IPL 2026: रोहित, रिकल्टन, पुरनने सामना गाजवला; चर्चा रघु शर्माच्या चिठ्ठीची, मजकूर वाचून सगळेच भावुक)

रोहितवर सायन रुग्णालयात उपचार सुरु

रोहितवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्यात अडकलेला कोयता काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मानखुर्द पोलीस आता संशयित आरोपी गौतमचा शोध घेत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article