 
                                            मनोज सातवी, प्रतिनिधी
Virar Swiming Pool Accident : विरार पश्चिमेकडील अमेया क्लासिक क्लबमध्ये (Ameya Classic Club) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी (Tuesday) संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये बुडून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ध्रुव सिंग बिष्ट (Dhruv Singh Bisht) असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी क्लब प्रशासनावर आणि पूलवर उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांवर (Trainer) निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ध्रुव हा आपल्या आईसोबत नेहमीप्रमाणे अमेया क्लासिक क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी आला होता. पोहत असताना तो अचानक पाण्यात बुडाला. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, या वेळी पूलवर उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांचे मुलाकडे योग्य वेळी लक्ष नव्हते.
ध्रुवच्या आईला तो दिसेनासा झाल्यावर त्यांनी पूलवरील ट्रेनरकडे चौकशी केली. त्यानंतर तातडीने शोध घेतला असता, ध्रुव पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. त्याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याला बायकोनेच प्रियकराच्या मदतीने संपवलं; हत्येचं कारण धक्कादायक )
 
क्लब प्रशासनावर गंभीर आरोप
क्लब प्रशासनाच्या (Club Administration) आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप ध्रुवच्या पालकांनी केला आहे. अवघ्या 4 वर्षांच्या ध्रुवचा पुढच्या महिन्यात, म्हणजेच डिसेंबरमध्ये (December 10) वाढदिवस होता. वाढदिवसाआधीच मुलाचा मृत्यू झाल्याने बिष्ट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाची नोंद बोळींज पोलिस ठाण्यात (Bolinj Police Station) आकस्मिक मृत्यू (Accidental Death) म्हणून करण्यात आली आहे. बोळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे (Prakash Kawale) यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "घटनेचा सर्वांगीण तपास केला जाईल आणि तपासामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल."
 
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
