मनोज सातवी
पाणी भरण्यावरून सुरू झालेलं भांडण एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. मुंबईजवळच्या विरार इथली ही घटना आहे. येथील जेपी नगर परिसरात पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेचं शेजारी राहणाऱ्या व्यक्तीशी भांडण झालं. राग अनावर झालेल्या महिलेने शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या तोंडावर डास मारण्याचा स्प्रे मारला, ज्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला. उमेश पवार (57) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर आरोपी महिलेचे नाव कुंदा तुपेकर (46) आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी कुंदा तुपेकरला अटक केली आहे.
नक्की वाचा: मजामस्ती करताना एक शब्द खटकला; मित्रांनी तरुणाला क्रूरपणे संपवलं
नेमके काय झाले ?
विरार पश्चिमेकडील जेपी नगर इथे हा प्रकार घडला आहे. इथल्या 15 क्रमांकाच्या इमारतीमध्ये मंगळवारी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. उमेश पवार आणि कुंदा तुपेकर यांच्यात बाचाबाची झाली होती. या दोघांमध्ये पाणी भरण्यावरून यापूर्वीही वाद झाल्याचे कळते आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. या वादामुळे संतापलेल्या कुंदाने घराकडे धाव घेत घरातून डास मारण्याचा स्प्रे आणला आणि तो उमेश पवारांच्या तोंडावर मारला. या स्प्रेमुळे उमेश पवार जागेवरच कोसळले होते. हा स्प्रे विषारी असल्याने पवार यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ज्यामुळे ते बेशुद्ध पडले.
नक्की वाचा: पतीला उपाशी ठेवले, पाया पडायला लावत पराकोटीचा छळ; बायको आणि सासूला तुरुंगवासाची शिक्षा
अर्नाळा सागरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
उमेश पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं मात्र डॉक्टर त्यांचे प्राण वाचवू शकले नाही. विषारी रसायनाचा तीव्र परिणाम झाल्याने त्यांचा जीव गेला, अशी प्राथमिक माहिती आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी सदर प्रकरणाची दखल घेतली असून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी महिला कुंदा तुपेकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpable Homicide) दाखल करण्यात आला आहे. कुंदा हिला अटक करण्यात आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.