सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Saibaba Temple Viral Video: उन्हाळी सुटीचा आज अखेरचा रविवार असल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.राज्यासह देशभरातील विविध भागांतून हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. साईमंदिर परिसर दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.सकाळच्या काकड आरतीपासूनच मंदिर परिसरात मोठी वर्दळ दिसून आली.दर्शनबारीत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने साईदर्शनासाठी चार तासांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उन्हाळी सुटी संपण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा अनेक भाविकांनी व्यक्त केली.त्यामुळे शनिवारपासूनच शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.रविवारी सकाळी ही गर्दी आणखी वाढल्याने मंदिर प्रशासनालाही गर्दी नियोजनासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्या लागल्या. दर्शनबारी पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.मंदिर परिसरातील दर्शनरांगेत महाराष्ट्रासह गुजरात,मध्य प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमधून आलेले भाविक सहभागी झाले होते.लहान मुले,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला. अनेक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन कुटुंबासह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेतला.
नक्की वाचा >> VIDEO: बंजी जंपिंगने घेतला जीव, कर्मचारी दोरी बांधायला विसरले, तरुणी थेट 130 फूट दरीत..
प्रसादालय,भक्तनिवास, पार्किंगमध्येही मोठी वर्दळ
गर्दीमुळे मंदिर परिसरातील रस्ते,प्रसादालय,भक्तनिवास आणि पार्किंग परिसरातही मोठी वर्दळ होती.साई संस्थानच्या विविध सुविधा केंद्रांवर भाविकांची सतत ये-जा सुरू होती.शहरातील हॉटेल्स,लॉजिंग आणि भोजनालयांमध्येही मोठी गर्दी दिसून आली.स्थानिक व्यावसायिकांसाठी हा रविवार आर्थिकदृष्ट्याही लाभदायक ठरल्याचे दिसून आले.
इथे पाहा साईबाबा मंदिर परिसरातील व्हायरल व्हिडीओ
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते.दर्शनरांगांचे व्यवस्थापन,वाहतूक नियंत्रण,सुरक्षा तपासणी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. गर्दी असूनही दर्शन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले.