जाहिरात

Shirdi News: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाताय? मंदिरातील 'हा' व्हिडीओ एकदा बघाच

उन्हाळी सुटीचा आज अखेरचा रविवार असल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.राज्यासह देशभरातील विविध भागांतून हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Shirdi News: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाताय? मंदिरातील 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
Shirdi Saibaba Temple Viral Video

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

Shirdi Saibaba Temple Viral Video: उन्हाळी सुटीचा आज अखेरचा रविवार असल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.राज्यासह देशभरातील विविध भागांतून हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. साईमंदिर परिसर दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.सकाळच्या काकड आरतीपासूनच मंदिर परिसरात मोठी वर्दळ दिसून आली.दर्शनबारीत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने साईदर्शनासाठी चार तासांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

उन्हाळी सुटी संपण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा अनेक भाविकांनी व्यक्त केली.त्यामुळे शनिवारपासूनच शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.रविवारी सकाळी ही गर्दी आणखी वाढल्याने मंदिर प्रशासनालाही गर्दी नियोजनासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्या लागल्या. दर्शनबारी पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.मंदिर परिसरातील दर्शनरांगेत महाराष्ट्रासह गुजरात,मध्य प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमधून आलेले भाविक सहभागी झाले होते.लहान मुले,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला. अनेक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन कुटुंबासह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेतला.

नक्की वाचा >> VIDEO: बंजी जंपिंगने घेतला जीव, कर्मचारी दोरी बांधायला विसरले, तरुणी थेट 130 फूट दरीत..

प्रसादालय,भक्तनिवास, पार्किंगमध्येही मोठी वर्दळ

गर्दीमुळे मंदिर परिसरातील रस्ते,प्रसादालय,भक्तनिवास आणि पार्किंग परिसरातही मोठी वर्दळ होती.साई संस्थानच्या विविध सुविधा केंद्रांवर भाविकांची सतत ये-जा सुरू होती.शहरातील हॉटेल्स,लॉजिंग आणि भोजनालयांमध्येही मोठी गर्दी दिसून आली.स्थानिक व्यावसायिकांसाठी हा रविवार आर्थिकदृष्ट्याही लाभदायक ठरल्याचे दिसून आले.

इथे पाहा साईबाबा मंदिर परिसरातील व्हायरल व्हिडीओ 

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते.दर्शनरांगांचे व्यवस्थापन,वाहतूक नियंत्रण,सुरक्षा तपासणी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. गर्दी असूनही दर्शन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

नक्की वाचा >> Ahilyanagar News: श्रीरामपुरात प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू,नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरविरोधात ठिय्या

दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाबाबत समाधान व्यक्त केले.प्रतीक्षा कालावधी अधिक असला तरी साईबाबांच्या दर्शनासाठी कितीही वेळ थांबण्याची तयारी असल्याचे भाविकांनी सांगितले.अनेक कुटुंबांनी शिर्डी भेटीला उन्हाळी सुटीचा समारोप असल्याचे सांगत साईचरणी प्रार्थना केली.

उन्हाळी सुटीचा शेवटचा रविवार आणि सलग सुटीचा लाभ घेत मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाल्याने साईनगरी पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली. साईनामाचा जयघोष, दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि मंदिर परिसरातील उत्साही वातावरण यामुळे संपूर्ण शिर्डी साईभक्तांच्या श्रद्धेने भरून गेल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. आगामी काही दिवसांमध्येही भाविकांची संख्या लक्षणीय राहण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com