राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही वानवा आहे. काही गावातील दृश्य परिस्थितीची भीषणता दाखवतात. काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. अशात नाशिकमधील दोन गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी गाव आणि पेठ तालुक्यातील कहांडोळ या आदिवासी पाड्यातील वास्तव पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. नाशिकमधील अनेक गावात पाहुण्यांना मुक्काम करण्यास नकार दिला जातो.
ग्रामीण भाग तसेच आदिवासी पाड्यांवर पाणीप्रश्न किती गंभीर बनलाय हे दाखवणारे फोटो समोर आले आहेत. नाशिकच्या पेठ तालुक्यातील कहांडोळ या आदिवासी पाड्याच्या एका विहीरीवरील दिवसाची धक्कादायक दृश्य आहेत. गावकऱ्यांना अनेक दिवस पाण्याचा थेंबही बघायला मिळत नाही, ग्रामपंचायतीकडून जवळच असलेल्या दमणगंगा नदीवरून पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा करण्यासही अडचणी निर्माण होतात. वीज पुरवठा सुरळीत होताच गावातील विहिरीत पाणी आणले जाते आणि विहिरीला पाणी येताच पाणी भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गावकऱ्यांची झुंबड उडते. पुन्हा पाणी मिळेल की नाही याची 'कोणीही गॅरंटी देत नसल्याने' पाणी भरण्यासाठी ड्रम किंवा घरातील इतर भांडी घेऊन गावकरी सहकुटुंब विहिरीवर पोहोचतात. कोणी दोराच्या सहाय्याने तर कोणी बादलीला साड्या बांधत विहीरीतून पाणी भरतात.
सिन्नर तालुक्यातील पांगरी गावातही जवळपास अशीच परिस्थिती आहे. या गावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने पाहूणे किंवा नातेवाईक आल्यास त्यांना मुक्काम करू दिला जात नाही. एकीकडे खाजगी टँकरच्या पाण्याचा दर परवडत नाही तर दुसरीकडे गावकऱ्यांना शासकीय टँकरची 8-9 दिवस वाट बघावी लागते. ज्या दिवशी टँकर येणार त्या दिवशी वयोवृद्ध महिलांसह सर्व कुटुंबच ड्रम आणि इतर भांडी घराबाहेर ठेवतात. कोणी झाडाखाली तर ओट्यावर बसून चार - चार तास टँकरच्या प्रतीक्षेत असतात. पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांचे हाल होत आहे. पिण्याच्या 20 लीटर पाण्यासाठी 20 रुपये म्हणजेच काय तर एक लीटरसाठी एक रुपया गावकऱ्यांना मोजावा लागतो. सिन्नर तालुक्यातील पांगरी गावातील गावकरी घराबाहेर बसून पाण्याच्या टँकरची चार तासापासून वाट बघतात. गावातील एका कुटुंबाने सांगितलं की, आमच्याकडे पाहुणे किंवा नातेवाईक आल्यास त्यांना मुक्काम करू देत नाही. पाणीच नसल्याने काहीच सूचत नाही. त्यामुळे आम्ही कसे दिवस काढतो आम्हाला माहीत.
नक्की वाचा - रेमल चक्रीवादळाचा कहर, आतापर्यंत 46 जणांनी जीव गमावला
पिण्याच्या 20 लीटर साध्या पाण्यासाठी 20 तर गार पाणासाठी 30 रुपये म्हणजेच एक लीटरसाठी एक रुपया गावकऱ्यांना मोजावा लागतो. दररोज 4 हजार लीटर पाण्याची विक्री होते, आम्ही 15 किमी लांबून पाणी आणतो आणि फिल्टर करतो अशी माहिती महाराष्ट्र वॉटर सर्विसेसचे संचालक सोपान पांगारकर सांगतात.