Chief Secretary Rajesh Kumar : राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
मुख्य सचिव राजेश कुमार यावेळी म्हणाले की, आपल्या मुख्य सचिवपदाच्या कालावधीत सर्व विभागांच्या सचिवांच्या सहकार्याने सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करण्याला प्राधान्य दिले जाईल. लोकांची कामे त्या-त्या ठिकाणीच व्हावीत, त्यांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व क्षेत्रांमध्ये प्रगत असलेल्या महाराष्ट्राला अधिक उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कामाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
(नक्की वाचा- NCP News: शरद पवारांना आणखी एक दणका, आता 'हा' नेताही साथ सोडणार, 'घड्याळ' हाती बांधणार)
कोण आहेत नवनियुक्त सचिव राजेश कुमार?
मुख्य सचिव राजेश कुमार (IAS 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे.
( नक्की वाचा : CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं )
राजेशकुमार यांनी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.