मुंबई नमहानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला. निकाल लागण्यास उशीर होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, आणि घडलेही तसेच. संध्याकाळी 6-7 वाजेच्या सुमारास कलांकडे नजर टाकली असता ठाकरे बंधू हे इतरांना सोबत घेतल्यास महायुतीला मागे टाकू शकतील असे चित्र दिसत होते, मात्र अंतिम निकाल येताच सगळे चित्र स्पष्ट झाले आणि मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झाले.
नक्की वाचा: BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेत कोण कोण झाले नगरसेवक? पाहा सर्व विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
महायुतीची धाकधूक संपली, चित्र स्पष्ट झाले
मुंबईमध्ये एकूण 227 जागा असून या सगळ्या जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. मुंबईसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी एकाचवेळी निवडणूक झाली. मुंबई महानगरपालिकेने 16 जानेवारी रोजी रात्री उशिरा अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध केली. या आकडेवारीनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या त्यावर एक नजर टाकूया.
- भाजप-89
- शिवसेना(उबाठा)- 65
- शिवसेना(एकनाथ शिंदे)- 29
- काँग्रेस-24
- एमआयएम- 8
- राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)- 3
- समाजवादी पक्ष- 2
- राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)- 1
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. या सत्तेला भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरूंग लावला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षात बसावे लागणार असून त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक हा विरोधी पक्षनेता होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेचा नगरसेवक विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होणार आहे.
नक्की वाचा: BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेची सत्ता गेली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणते पर्याय?
28 जानेवारीला महापौरपदासाठी निवड
मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार याचा निर्णय 28 जानेवारीला होणार आहे. सध्याचे संख्याबळ पाहाता भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांचे मिळून 118 नगरसेवक आहेत. यामुळे त्यांनी बहुमताचा आकडा गाठला असून सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता असून मुंबई महानगरपालिकेच्या समित्यांचे अध्यपद कोणाला मिळणार याचीही मोठी उत्सुकता आहे. सध्याचे आकडे पाहाता स्थायी समिती, सुधार समितीचे अध्यक्षपद हे भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. बेस्ट समिती , शिक्षण समिती अध्यक्षपद हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.