Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अनेक महत्त्वाची खाती होती. अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती कोणाला मिळणार? याबाबत चर्चा रंगलीय. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी (29 जानेवारी) रात्री उशीराने भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणकोण उपस्थित होते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. अजित पवारांकडे असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पक्षांतर्गत घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज (30 जानेवारी) दुपारनंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे.
दरम्यान अजित पवार यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये 'अर्थ खाते' हे सर्वाधिक महत्त्वाचे खाते आहे. तसेच उत्पादन शुल्क आणि नियोजन खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव दिला जाणार आहे? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
(नक्की वाचा: Ajit Pawar News:अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर... रावसाहेब दानवेंनी सांगितली Inside Story)
अजित पवार यांच्याकडे कोणती खाती होती?
- उपमुख्यमंत्रिपद
- वित्त आणि नियोजन
- राज्य उत्पादन शुल्क
- क्रीडा आणि युवक कल्याण
- अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
अजित पवार यांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित करण्याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय. दोन्ही पक्ष विलिन करण्याबाबत पुढील काही दिवसांत पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) अध्यक्ष शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार आणि राशप गटाकडून सुप्रिया सुळे, स्वतः शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते. आता अजित पवार यांचे निधन झाल्याने पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जातंय.
(नक्की वाचा: Ajit Pawar: अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी परवानगीशिवाय घडली गंभीर घटना, जर संशयास्पद आढळलं तर...)
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का?दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल व्हावे, असा सूर असल्याची माहिती आहे.