Raj-Uddhav Thackeray alliance: शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी युतीवर शिक्कामोर्तब केले. या युतीमध्ये नेमके कोणते पक्ष असतील, यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ही युती केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज आणि उद्धव यांच्यासोबत या युतीत शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल अशी चर्चा आहे. तर नाशिक आणि इतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या युतीचा भाग असतील अशी शक्यता आहे.
महाराष्ट्र प्रेमींची युती
उद्धव ठाकरे यांनी या नव्या आघाडीला 'महाराष्ट्र प्रेमींची युती' असं म्हटलं आहे. ते म्हणाले, "जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत आणि ज्यांना महाराष्ट्राचे रक्षण करायचे आहे, त्या सर्वांसाठी ही युती खुली आहे. ही केवळ राजकीय युती नसून महाराष्ट्र रक्षणासाठी उभारलेला एक लढा आहे." नाशिकमध्ये युतीवर आधीच शिक्कामोर्तब झाले असून, इतर महापालिकांमध्येही लवकरच अधिकृत घोषणा होईल.
(नक्की वाचा- Raj-Uddhav Thackeray: "मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच असेल!", राज ठाकरेंनी व्यक्त केला ठाम विश्वास)
युतीचे नाव आणि बाळासाहेबांचा वारसा
जरी 'महाराष्ट्र प्रेमींची युती' असे संबोधन उद्धव ठाकरेंनी केले असले, तरी निवडणूक प्रचारात *'बाळासाहेब ठाकरे'* यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. "मराठी माणूस आणि हिंदुत्व" या बाळासाहेबांच्या मूळ विचारांवर ही युती आधारित असेल, ज्यामुळे हाच 'खरा वारसा' असल्याचे जनतेला पटवून देणे सोपे जाईल.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
या युतीच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "माझे दोन बंधू एकत्र येत आहेत, याचा मला आनंदच आहे. मी याआधी सगळ्या मोठ्या कार्यक्रमांना आत्या म्हणून उपस्थित होते. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी संजय राऊत साहेबांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे."