Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारुन दोन महिने उलटून गेले तरी देवेंद्र फडणवीस अधिकृत वर्षा निवासस्थानी राहायला गेले नाहीत. यावरुन आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा आहे. मात्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप राहायला का जात नाहीत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पुढे म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला जाण्यास तयार आहेत. ते म्हणतात मी राहायला गेलो तरी तिथे झोपायला जाणार नाही. म्हणजे हा काय प्रकार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला याबाबत चिंता लागून राहिली आहे. याचं उत्तर या लिंबूवाल्यांनी द्यावं.
(नक्की वाचा - Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?)
"शिंदे गटात सगळे लिंबूसम्राट आहे. माझ्या असं कानावर आलं आहे की भाजपच्या अंतर्गत गटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करण्यात आलं आहे. तिथे कामाख्या देवीवरुन जे रेडे कापले त्या रेड्याची शिंग पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये यासाठी मंतरलेली शिंग आणली आहेत. आता हे खरं आहे की खोटं माहित नाही. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मुलन कायदा मानणारी लोक आहोत", अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.
(नक्की वाचा- CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)
"वर्षा मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? तिथे नेमकं काय झालं आहे? कुणामुळे झालं आहे? मुख्यमंत्री एवढे अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत? हे महाराष्ट्राला समजायला हवं", असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.