मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येवू शकतात असं विधान केलं होतं. या विधानावर आता शिवसेना शिंदे गटात जोरदार घमासान माजले आहे. शिरसाट यांच्या या विधानाचा आधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी समाचार घेतला होता. शिरसाट काय बोलतात याला काही महत्व नाही असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांचे पिता आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी ही शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत संजय शिरसाट हा इतका मोठा माणूस नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पिता पुत्रांनी शिरसाट यांची शिवसेनेतच कोंडी केली आहे. त्यावर शिरसाट आता काय बोलणार की शांत रहाणं पसंत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रामदास कदम यांनी शिरसाट यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांच्यावर टीकाही केली. संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही. आम्ही 55 वर्ष शिवसेनेत घासली आहे. आम्ही शिवसेनेचे नेते झालो. संजय शिरसाठ जे काही बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी पुष्कळ काही केलं असावं, म्हणून त्यांचे इतकं प्रेम उतू जात असावं अशा शब्दातही कदम यांनी शिरसाट यांना सुनावलं. एकनाथ शिंदेच्या मुळावर जे उठले त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं या निमित्ताने कदम यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही. फक्त त्यांचा मुलगा आणि त्यांचे नातेवाईक हे दोघेच राहतील. शिवाय एक दिवस रात्री दोन वाजता हे देश सोडून निघून जातील, असं ही कदम म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांना ही लक्ष्य केलं. आदित्य यांची औकात काय आहे, मला काका म्हणून म्हणून माझं खातं समजून घेतलं. नंतर माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. माझं खातं हिरावून घेतलं असं पुन्हा एकदा कदम म्हणाले.
बाळासाहेबांच्या भूमिकेला मूठ माती देण्याचं काम काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी केलं. आता भाजपा त्यांना कशाला जवळ करेल असंही कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात शिवसेनेच्या आमदारांना किती फंड दिला. त्याच वेळी अजित पवारांनी आपल्या आमदारांना किती फंड दिला हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान कदम यांनी दिले. मुख्यमंत्रिपदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षीमुळे शिवसेना फुटली असा आरोपही कदम यांनी यावेळी केला.
ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime News: 'जामीन झाला नाही तर एके 47 घेऊन येतो' आधी अन्यायनंतर धमकी
देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पाच वेळा उद्धव ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण देवेंद्र फडणवीसांना मातोश्रीत घेतलं नाही. तेच उद्धव ठाकरे फुलांचा मोठा बुके घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात आहेत. इतके ते लाचार झाले आहेत. खालचं काढलं आणि डोक्याला गुंडाळलं अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली आहे, असा घणाघातही कदम यांनी केला. एकनाथ शिंदे यांचे राजकारण उद्धवस्त करण्याचा डाव संजय राऊत यांनी आखला असल्याचेही कदम यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world