जाहिरात

World cancer day: कर्करोग टाळता येतो, तज्ज्ञांनी दिलेला 'हा' सल्ला नक्की पाळा

भारतात प्रत्येक पाच पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक आठ महिलांपैकी एक जण कर्करोगाचा धोका आहे.

World cancer day: कर्करोग टाळता येतो, तज्ज्ञांनी दिलेला 'हा' सल्ला नक्की पाळा
मुंबई:

जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला, आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल डी'क्रूझ यांनी भारतात झपाट्याने वाढणाऱ्या कर्करोगाबाबत गंभीर इशारा दिला. प्रतिबंध आणि वेळेत निदान हीच या जीवघेण्या आजाराविरुद्धची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत असं मत डिक्रूझ यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या परिसंवादात बोलताना, त्यांनी सांगितलं की भारतात प्रत्येक पाच पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक आठ महिलांपैकी एक जण कर्करोगाचा धोका आहे. बदलत्या जीवनशैली, पर्यावरणीय ऱ्हास आणि जागरूकतेच्या अभावामुळे हा धोका वाढत आहे. लाखो लोकांचे प्राण कर्करोगामुळे गेले आहेत, तरी हा आजार बर्‍याच प्रमाणात टाळता येऊ शकतो. सिगारेट आणि मद्य सेवन टाळणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे या सवयी अंगीकारल्यास कर्करोग टाळता येऊ शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबागोपाल फाउंडेशनतर्फे आयोजित या परिसंवादात प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, धोरणकर्ते आणि 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध समाजसेवी डॉ. हरीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ‘जागेगा भारत तो बचेगा भारत' अभियानाच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. आपल्या खास काव्यशैलीत मंत्री आठवले यांनी लोकांसाठी आरोग्यसंबंधी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय यांवर भर देण्याची आवश्यकता स्पष्ट केली. तसंच आपण मद्यपान करत नसल्याने अनेक आजारांपासून दूर राहिल्याचे हे त्यांनी सांगितले. 

तंबाखू आणि मद्य – कर्करोगाचा मोठा धोका

डॉ. डी'क्रूझ यांनी स्पष्ट केले की, भारतातील कर्करोगाच्या जवळपास 40% प्रकरणे तंबाखू सेवनामुळे होतात. त्यामुळे तंबाखूच्या सेवनावर कठोर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्यांनी लोकांना धूम्रपान आणि तंबाखू चघळणे त्वरित बंद करण्याचे आवाहन केले. तसेच, मद्य सेवनाबाबतच्या चुकीच्या समजुती दूर करत, अगदी थोडेसे मद्यपानही सुरक्षित नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, त्यांनी संसर्गजन्य कर्करोगांबाबतही माहिती दिली. मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) मुळे होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण आणि नियमित तपासणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. लठ्ठपणा हा कर्करोगाचा मोठा जोखीमकारक घटक असल्याने, आरोग्यदायी वजन राखण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. जीवनसत्त्वे A, C आणि E तसेच फायबरयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला आहार कर्करोगाचा धोका कमी करू शकतो,असं ही त्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

पारंपरिक आहार आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व

पद्मश्री पुरस्कार विजेते आणि शून्य-बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते डॉ. सुभाष पाळेकर यांनी आहार आणि कर्करोग यातील संबंध उलगडून सांगितला. रासायनिक पदार्थांवर अवलंबून राहण्यामुळे आणि पाश्चात्य आहाराच्या वाढत्या प्रभावामुळे आंबट पदार्थांचे प्रमाण वाढले आहे, जे कर्करोग आणि इतर जुनाट आजारांना खतपाणी घालतात. म्हणूनच, त्यांनी बाजरी, डाळी आणि ताज्या भाज्यांवर आधारित पारंपरिक भारतीय आहाराकडे परत जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर हा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे अधोरेखित केले. शेतकऱ्यांनी नैसर्गिक, विषमुक्त अन्ननिर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन ही केले.

ट्रेंडिंग बातमी - Kumbh Mela : कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांची फसवणूक, सांगितलं एक केलं भलतचं, मंत्र्यांच्या कार्यक्रमात राडा

निसर्ग आणि आरोग्य – एकत्रित उपाय

दिल्लीतील वृद्ध दाम्पत्य पीटर सिंग आणि निनो कौर यांनी त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीमुळे ल्युकेमियावर मात करण्याच्या प्रवासाची कहाणी शेअर केली. निनो यांना रक्ताचा कर्करोग झाल्यानंतर, त्यांनी आपल्या घराभोवती 12000 हून अधिक झाडे लावून संपूर्ण परिसर एक लहानसं जंगल बनवलं. त्यांनी ‘अक्वाटोनिक्स' या नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर करून मातीशिवाय भाज्या पिकवायला सुरुवात केली.  नैसर्गिक खते वापरली. त्यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे आज हजारो लोक प्रेरित झाले आहेत, हे उदाहरण देत त्यांनी निसर्गच आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - Union Budget 2025 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्य

जलतज्ज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग यांनी पर्यावरणीय ऱ्हास आणि वाढत्या कर्करोगाच्या घटना यांच्यातील थेट संबंध उलगडून सांगितला. भारतातील नद्या, ज्या कधी काळी शुद्ध आणि जीवनदायी होत्या, त्या आता प्रदूषित झाल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये शहरीकरण आणि औद्योगिक कचऱ्यामुळे जलस्रोत नासाडीला लागले असून, त्यामुळे कर्करोगासह अनेक आजार वाढत आहेत. पंचमहाभूतांचे संरक्षण हेच निरोगी जीवनाचे गमक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - Union Budget 2025: देशाचा अर्थसंकल्प सादर! काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर...

‘कर्करोगमुक्त भारत'साठी व्यापक चळवळीची गरज

‘जागेगा भारत तो बचेगा भारत' या मोहिमेचे नेतृत्व करणारे डॉ. हरीश शेट्टी यांनी कर्करोग प्रतिबंधासाठी व्यापक जनचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 4 फेब्रुवारीला ‘जागतिक कर्करोगमुक्त दिवस' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, जेणेकरून उपचाराऐवजी प्रतिबंधावर अधिक भर देता येईल. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि प्रदूषणमुक्त माती ही नागरिकांची मूलभूत हक्के असून, देशाने रसायनमुक्त शेतीकडे वळण्याची नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक भारतीयाने आपल्या आरोग्याची आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेत पर्यावरणस्नेही जीवनशैली अवलंबावी, असे त्यांनी आवाहन केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: