मुंबईतील वरळी येथील कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS) रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एका गंभीर अपघातग्रस्त रुग्णाला जीवनदान दिले आहे. डहाणू येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ५० वर्षीय व्यक्तीचे पाय पूर्णपणे निकामी होण्याच्या स्थितीत होते. मात्र, वरळी रुग्णालयाच्या ट्रॉमा तज्ज्ञांनी वेळेचे गांभीर्य ओळखून एका अत्यंत गुंतागुंतीच्या 'अवयव-बचाव' (Limb-Saving) शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाचा पाय कापण्यापासून वाचवण्यात मोठे यश मिळवले आहे.
4 तासांचा प्रवास आणि सेप्टिसेमिक शॉकचा धोका
डहाणू येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सुमारे चार तासांचा प्रवास करून वरळी येथील ईएसआयएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात रुग्णाच्या दोन्ही पायांतील टिबिया हाडांना उघडी फ्रॅक्चर, डाव्या मांडीच्या फेमर हाडाला उघडे फ्रॅक्चर, डाव्या गुडघ्याच्या पटेलाला फ्रॅक्चर तसेच दोन्ही खालच्या अंगांवर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आणि अनेक उघड्या जखमांमुळे रुग्णाला सेप्टिसेमिक शॉकचा गंभीर धोका निर्माण झाला होता.
'डॅमेज कंट्रोल ऑर्थोपेडिक्स' पद्धतीचा यशस्वी वापर
रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन अस्थिरोग विभागाचे प्रमुख व प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. अमेय नरेंद्र पोवार यांनी तातडीने ‘डॅमेज कंट्रोल ऑर्थोपेडिक्स' या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही टिबिया आणि डाव्या फेमर हाडांना एक्स्टर्नल फिक्सेटर बसवून फ्रॅक्चर स्थिर करण्यात आले. त्यानंतर जखमांची सखोल स्वच्छता आणि डेब्राइडमेंट प्रक्रिया पार पडली. या आव्हानात्मक शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. अमेय पोवार यांनी केले. त्यांना डॉ. मेहर प्रदीप कुमार मेहता आणि डॉ. संकेत श्रीकांत पाटील या अस्थिरोग तज्ज्ञांचे सहकार्य लाभले. भूलतज्ज्ञांच्या पथकात डॉ. बुशरा शेख आणि डॉ. शर्मा यांचा समावेश होता. तसेच ऑपरेशन थिएटर कर्मचारी, परिचारिका आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत उपचार प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
'REMEX-KA6' अत्याधुनिक तंत्रज्ञान ठरले महत्त्वाचे
या शस्त्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक ठरला तो ‘रेमेक्स-केए6' (REMEX-KA6) हा अत्याधुनिक पोर्टेबल रेडिओग्राफी सिस्टम. शस्त्रक्रियेदरम्यान तत्काळ आणि अचूक प्रतिमा उपलब्ध झाल्याने फ्रॅक्चरचे अचूक मूल्यमापन करणे आणि आवश्यक उपचार त्वरित करणे शक्य झाले. उच्च जोखमीच्या ट्रॉमा रुग्णांवरील उपचारांमध्ये या तंत्रज्ञानाने निर्णायक भूमिका बजावली.
ही आधुनिक पोर्टेबल रेडिओग्राफी प्रणाली महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या दूरदृष्टीतून आणि विशेष प्रयत्नांतून रुग्णालयाला उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रवींद्रन (आयएएस), महाराष्ट्र ईएसआय सोसायटीचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (आयएएस) तसेच वैद्यकीय संचालक डॉ. अशोक थोरात यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रशिक्षित डॉक्टर आणि समन्वयित आरोग्यसेवा यांची सांगड घातल्यास गंभीर अपघातग्रस्त रुग्णांनाही प्रभावी उपचार देणे शक्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world