स्वप्नाली सपकाळे, प्रतिनिधी
Badlapur Shocking News : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखलोली परिसरात असलेल्या एका मार्टमधून एका ग्राहकाने मॅगी खरेदी केली होती. त्या मॅगीत किडे आढळल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मॅगी पॅकेटवर एक्स्पायरी डेट जुलै 2026 असतानाही मॅगीत किडे आढळले. एक्सपायरी डेट पूर्णपणे योग्य असताना मॅगीत किडे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर ग्राहकाने तातडीनं संबंधीत मार्टमध्ये जाऊन येथील व्यवस्थापनाकडे तक्रार केली.
मॅगीचा स्टॉक बाहेर काढला आणि विक्रीसाठी बंद केला
त्यानंतर मार्टचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी डिस्प्लेवरील संपूर्ण मॅगीचा स्टॉक बाहेर काढला आणि तो विक्रीसाठी बंद केला.ग्राहकाने इतर मॅगीचे पॅकेट्स फोडून पाहिले असता त्या पॅकेट्समध्ये बुरशी लागल्याचंही आढळून आलं. मार्टमधील मॅगीच्या खराब पॅकेट्समुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून अन्न व औषध प्रशासनाकडून या मार्टची तपासणी केली जाणार का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> Matheran News : 10 फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी
या प्रकाराबाबत ग्राहकाने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "पटेल आर मार्टमधून सामान घेतलं होतं. त्यावेळी मॅगी खरेदी केली होती. मॅगी एक्स्पायरी डेटची नाहीय. पण मॅगीत किडे निघाले आहेत. माझ्या पोरांना त्रास होऊ नये तसच इतर मुलांनाही त्रास होता कामा नये,त्यासाठी मी इथे आलो. त्यांनी मला सांगितलं की मी तुमचे पैसे रिफंड करतो. माझेच पैसे मी रिफंड घेऊ आणि मी शांत बसू..पण मी शांत का बसू? दोन दिवसांपूर्वी मी मॅगी खरेदी केली होती. माझ्याकडे संपूर्ण बील आहे. मॅगीचं पॅकेट फोडल्यावर त्यातून किडे निघाले. माझ्या घरात दोन पोरी आहेत. माझ्या पोरींच्या पोटात दुखायला लागलं. नंतर मी मॅगी पाहिली तर त्यात किडे निघाले. त्यानंतर मी इथे आलो.आरोग्य विभागामार्फत तातडीने चौकशी करावी. संबंधित मार्टवर योग्य ती कारवाई करावी. नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होता कामा नये".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world