भुपेंद्र आंबवणे, भिवंडी
भिवंडी शहरात मोबाईल चोरीचा संशयावरून एका युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवून सात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शहरातील गोविंदनगर राहुल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पाईपलाईननजीकच्या रस्त्याजवळ एका अनोळखी व्यक्तीची हत्या झाली होती. हत्येची घटना रात्रीच्या सुमारास झाल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांचं तपास पथक घटनास्थळी दाखल होत, त्यांनी मयत व्यक्तीची ओळख पटवण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी कोणतीही माहिती नसताना परिसरात माहिती घेत त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यानंतर मोहम्मद रहमत शहा आलम (वय 20 वर्ष) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मार्फत आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवून अरमान अन्सारी या मुख्य आरोपीसोबत त्याच्या पाच ते सात साथिदारांना ताब्यात घेतले.
आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर मोबाईल चोरीच्या संशयावरून लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून मोहम्मद रहमत आलमची हत्या केल्याचे समोर आले. अशारितीने गुन्हा समजल्यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. यातील अजून काही आरोपी असून त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पोलीस पथक रवाना केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world