Champions Trophy : Opening Ceremony साठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार? मोठी अपडेट आली समोर

19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीला स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. या सामन्याआधी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पाकिस्तानात होणारी चॅम्पिअन्स ट्रॉफी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानात अधिकृत Opening Ceremony साठी जाणार की नाही याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आपले सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेत सहभागी संघ वेगवेगळ्या दिवशी पाकिस्तानात येणार असल्यामुळे चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी Opening Ceremony होणार नसून कर्णधारांचं फोटोशूटही होणार नाहीये.

दोन्ही देशांतील खराब राजकीय संबंधांमुळे भारताने पाकिस्तानात जाऊन स्पर्धा खेळण्यास नकार दिला होता. यावर तोडगा म्हणून ICC ने पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या स्पर्धेत भारतासाठी त्रयस्थ जागेची तर भारताकडे यजमानपद असलेल्या स्पर्धेत पाकिस्तानसाठी त्रयस्थ जागेची तरतूद केली होती.

Advertisement

19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीला स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. या सामन्याआधी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला जाईल.

हे ही वाचा - 'बोलण्याची इच्छा नसेल तर...' अभिनेत्रीला मेसेज करण्यावर पाकिस्तानी क्रिकेटरचं उत्तर, Video

"याआधीही वन-डे वर्ल्डकपप्रमाणे चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेत कधीही Opening Ceremony आयोजित करण्यात आलेली नव्हती. 2023 साली भारताने वन-डे विश्वचषकाचं आयोजन केलं तेव्हाही असा कोणताही कार्यक्रम झाला नव्हता. त्यावेळी सर्व कर्णधारांचं एक संयुक्त फोटोशूट आणि एकत्रित पत्रकार परिषद पार पडली होती. मागच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही Opening Ceremony झालेली नव्हती. त्यामुळे या स्पर्धेतही असा कोणताही कार्यक्रम नसेल", अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलताना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्व कर्णधारांचं फोटोशूटही होणार नाहीये. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ हे 18 आणि 19 फेब्रुवारीला पाकिस्तानात दाखल होणार आहेत, त्यामुळे फोटोशूट होण्याची शक्यता मावळली आहे. याच कारणामुळे चॅम्पिअन्स ट्रॉफीआधी सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. आयसीसी स्पर्धांमध्ये सराव सामन्यांचं आयोजन करणं ही आतापर्यंतची प्रथा राहिलेली आहे. परंतु या स्पर्धेत आयोजनाच्या दृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तयारी अत्यंत निराशाजनक राहिल्यामुळे या सर्व आयोजनाला कात्री लावण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. त्यांचा दौरा 14 फेब्रुवारीला संपणार आहे. यानंतर कांगारुंचा संघ छोटीशी विश्रांती घेऊन पाकिस्तानात दाखल होईल. इंग्लंडचा संघही सध्या भारत दौऱ्यावर आहे. 12 फेब्रुवारीला अखेरचा सामना खेळून इंग्लंडचा संघही छोटीशी विश्रांती घेत पाकिस्तानात दाखल होणार आहे.

अवश्य वाचा - Wankhede@50: भन्नाट किस्से! सुनिल गावस्कर ते अजिंक्य राहणे, वानखेडे स्टेडीयमच्या आठवणीत सगळेच रमले