भारतीय संघाचा विकेटकिपर-फलंदाज दिनेश कार्तिकने महिन्याभरापूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या मैदानासोबतच कॉमेंट्रीमध्येही दिनेशने आपली वेगळी छाप पाडली आहे. अशातच त्याच्या खांद्यावर आता नवीन जबाबदारी आली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या बॅटींग कोच आणि मेंटॉर पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
RCB च्या संघाने X अकाऊंटवर दिनेशच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये २५७ सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावावर ४ हजार ८४२ धावा जमा आहेत. २६.३२ च्या सरासरीने त्याने धावा काढल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज एलेव्हन पंजाब आणि RCB या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
नियुक्तीबद्दल काय म्हणाला दिनेश कार्तिक?
एखाद्या संघाला प्रोफेशनल पद्धतीने कोचिंग करणं यासाठी मी खरंच उत्सुक आहे. माझ्या आयुष्यातला हा एक नवीन धडा आता सुरु होतोय. मला आशा आहे की माझा अनुभव माझ्या संघातील सहकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
भारतीय संघाकडून कसं राहिलं आहे दिनेश कार्तिकचं करिअर?
दिनेशने भारताकडून ९४ वन-डे सामने खेळले ज्यात त्याच्या नावावर १ हजार ७९२ धावा जमा आहेत. ज्यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकच्या नावावर १ हजार २५ धावा जमा असून यात बांगलादेशविरुद्ध शतकी खेळीचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दिनेश कार्तिकने ६० सामन्यांमध्ये ६८६ धावा केल्या आहेत.
हे ही वाचा - राहुल द्रविडने पुन्हा हेड कोचसाठी अर्ज का दाखल केला नाही? खरं कारण आलं समोर...