
मुंबई: पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन कार्यक्रमात दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मंत्री कोकाटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिम्पिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
India's Squad For Asia Cup: यशस्वी जैस्वालसह 3 मोठ्या स्टार्सना मिळणार नाही जागा! वाचा कशी असेल टीम?
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे कुर्ला येथील जामसासाहेब मुकादम व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राच्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, क्रीडा भारतीचे कोषाध्यक्ष गणेश देवरुखकर, मुंबई अध्यक्ष मिलिंद डांगे आणि ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव उपस्थित होते.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाची मराठमोळे ढोल आणि लेझिमाच्या तालावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश ऐकवण्यात आला. या संदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले की, आजच्या यांत्रिक युगात मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली असताना तन-मनाने सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचे पुनरुज्जीवन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात येत आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे तसेच विभागाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या देशी खेळांना मैदाने उपलब्ध करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विभागाचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.
( नक्की वाचा : Asia Cup 2025: ठरलं! आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी अन् कुठे होणार स्पर्धा? वाचा डिटेल्स )
क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी क्रीडा प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा भरविण्यात येतील, असे मंत्री कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world