रोहितची निवृत्ती, भारताच्या टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे? जय शाह म्हणतात...

हार्दिक पांड्याने आतापर्यंत १६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. ज्यात १० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दोन दिवसांपूर्वी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक जिंकला. संपूर्ण देश हा आनंदोत्सव साजरा करत असतानाच विराट कोहलीसह रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला. त्यामुळे रोहित शर्मानंतर भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद कोणाकडे जाणार याबद्दल चर्चेला सुरुवात झाली आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचं उप-कर्णधारपद हे हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे रोहितनंतर हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार असेल का असा प्रश्न बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना विचारण्यात आला.

हे ही वाचा - टीम इंडियाला नवीन हेड कोच कधी मिळणार? जय शाह म्हणतात...

टी-२० संघाच्या कर्णधारपदाबाबत जय शहा म्हणाले -

कर्णधारपदाचा निर्णय निवड समिती घेईल. त्यांच्याशी चर्चा करुन आम्ही याबद्दलची घोषणा करु. तुम्ही मला हार्दिक बद्दल विचारत आहात. त्याच्या फॉर्मबद्दल अनेक प्रश्न विचारले जात होते, परंतु निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्यानेही स्वतःला सिद्ध करुन दाखवलं.

Advertisement

हार्दिक पांड्याने आतापर्यंत १६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. ज्यात १० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. याव्यतिरीक्त ३ वन-डे सामन्यांमध्येही हार्दिक भारताचा कर्णधार राहिलेला आहे. आयपीएलमध्ये दोन हंगाम गुजरात टायटन्सचं नेतृत्व केल्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. परंतु रोहितला वगळून हार्दिककडे कर्णधारपद दिल्यामुळे त्याला बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

हे ही वाचा - Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?

Advertisement

टी-२० विश्वचषक पार पडल्यानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायला जाणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेत मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे.

Topics mentioned in this article