बार्बाडोस येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत वर्ल्डकप जिंकला. तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकप आणि ११ वर्षांनी एखादी ICC ट्रॉफी भारतात परतली आहे, त्यामुळे या विजयाला खास महत्व प्राप्त झालं आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारताचे सिनीअर खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडचाही कार्यकाळ या विश्वचषकासोबत संपुष्टात आला आहे. त्यामुळे राहुल द्रविडच्या जागेवर हेडकोच म्हणऊन कोण येणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दल माहिती आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेदरम्यान टीम इंडियाला नवीन हेड कोच मिळेल असं जय शाह म्हणाले आहेत.
हे ही वाचा - T-20 WC BLOG : रोहित नावाचं इमोशन
श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी शुबमन गिलच्या नेतृत्वात युवा भारतीय संघ ६ जुलैपासून झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळेल. झिम्बाब्वे दौऱ्यावर युवा भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी NCA प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण जाणार असल्याचंही जय शाह म्हणाले.
"हेड कोच आणि निवड समितीमधील सदस्यांची घोषणा लवकरच केली जाईल. क्रिकेट सल्लागार समितीने यासाठी मुलाखती घेतल्या असून दोन उमेदवारांची नावं निश्चीत झाली आहेत. मी मुंबईत पोहचल्यानंतर याबद्दलची घोषणा होईल. श्रीलंकेविरुद्ध मालिकेपासून टीम इंडियाला नवीन हेड कोच मिळेल", असं जय शाह म्हणाले.
हे ही वाचा - T-20 WC : टीम इंडियाचे 'सर जाडेजा' आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त
मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी गौतम गंभीर आणि महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही.रमन यांनी मुलाखत दिल्याचं कळतंय. यापैकी गौतम गंभीरचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचा - वर्ल्ड कपमधील विजयानंतर भारतीय खेळाडू मालामाल, BCCI कडून मोठ्या बक्षिसाची घोषणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world