जाहिरात

ENG vs SA: सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड जो रुटने मोडीत काढला, तुफानी फलंदाजीने उडवून दिली क्रिकेट विश्वात धमाल

Joe root record in ODI: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात जो रूटने इतिहास रचला. 'रूट'ने एका झटक्यात सचिन तेंडुलकर आणि रोहीत शर्माचे महाकाय रेकॉर्ड मोडीत काढले.

ENG vs SA: सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड जो रुटने मोडीत काढला, तुफानी फलंदाजीने उडवून दिली क्रिकेट विश्वात धमाल
मुंबई:

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावत अनेक मोठे विक्रम मोडले. त्याच्या या शतकाच्या जोरावर इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवत दक्षिण आफ्रिकेचा 342 धावांनी दणदणीत पराभव केला (South Africa suffer biggest defeat in ODI history). हा विजय इंग्लंडसाठी अनेक महत्त्वपूर्ण विक्रमांची नोंद करणारा ठरला.

इंग्लंडच्या फलंदाजांची तुफानी फटकेबाजी

हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा होता (England vs South Africa, 3rd ODI). इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 विकेट गमावत 414 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडचा सलामीवीर जेमी स्मिथने (62) आणि युवा फलंदाज जेकब बेथेलने (110) शानदार खेळी केली. विशेष म्हणजे बेथेलचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक होते. बेथेलने जो रूट सोबत 182 धावांची भक्कम भागीदारी रचली. या सामन्याचा नायक ठरला तो जो रूट. त्याने 96 चेंडूंमध्ये आपले 100 धावा पूर्ण केले.

नक्की वाचा: ऋतुराजच्या नशिबी पुन्हा उपेक्षा! 184 रन्सची खेळीही व्यर्थ, निवड समितीनं पुन्हा डावललं

एक शतक ठोकले,अनेक विक्रम मोडीत निघाले

रूटच्या या शतकाने एक मोठा विक्रम मोडून काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 19 शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा (181 डाव) आणि क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (194 डाव) मागे टाकले. रूटने हा टप्पा केवळ 172 डावांमध्ये पूर्ण केला (Quickest Innings to 19 ODI Centuries). या यादीत तो बाबर आझम (102 डाव) आणि विराट कोहली (124 डाव) यांच्या पाठी असून या यादीत तो 6 व्या स्थानावर आहे. असं असलं तरी त्याने दाखवून दिले की अजूनही त्याची धावांची भूक संपलेली नाही आणि तो अजूनही आक्रमक क्रिकेट खेळू शकतो. (Joe Root Create History in ODI).

नक्की वाचा: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि स्वरुप

दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव

415 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सुरुवातीपासूनच आफ्रिकेच्या फलंदाजांना धडकी भरवली. त्याने भेदक गोलंदाजी करत अवघ्या 9 षटकांत 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या. त्याचा वेग आणि स्विंग आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी खूपच अवघड ठरला. त्याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण संघ 20.5 षटकांत फक्त 72 धावांतच ऑल आऊट झाला. (South Africa suffer biggest defeat in ODI history). आदिल रशीदने 3 बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेसाठी हा केवळ पराभव नव्हता, तर एक मोठा मानहानीकारक अनुभव होता. इंग्लंडने नोंदवलेला 342 धावांचा विजय हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारताने 2023 मध्ये श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला होता, तो विक्रम आता मोडला गेला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com