लखनऊच्या जखमेवर KKR चं 'सॉल्ट', 8 विकेट राखून जिंकला सामना

फिल सॉल्टच्या नाबाद अर्धशतकी खेळीसमोर लखनऊचे गोलंदाज हतबल

जाहिरात
Read Time: 2 mins
KKR ला विजय मिळवून देणारी सॉल्ट-अय्यरची जोडी (फोटो सौजन्य - IPL)
कोलकाता:

आयपीएलच्या सतराव्या हंगामात श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपरजाएंटवर 8 विकेट राखून मात केली. सर्वात आधी KKR च्या बॉलर्सनी टिच्चून मारा करत लखनऊला निर्धारित ओव्हर्समध्ये 161 धावांवर रोखलं. प्रत्युत्तरादाखल विजयासाठी मिळालेलं आव्हान KKR ने फिल सॉल्टच्या नाबाद 89 रन्सच्या जोरावर पूर्ण केलं.

लखनऊची अडखळती सुरुवात -

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनऊ सुपरजाएंट संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या विकेटसाठी 19 धावांची भागीदारी केल्यानंतर वैभव अरोराने क्विंटन डी-कॉकला बाद केलं. यानंतर लोकेश राहुलने दिपक हुडाच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मिचेल स्टार्कने हुडाला बाद करत लखनऊला दुसरा धक्का दिला.

अवश्य वाचा - टी-20 वर्ल्डकपआधी 'ही' गोष्ट कराच, CSK च्या कोचचा टीम इंडियाला सल्ला

लोकेश राहुल-आयुष बदोनीने सावरला लखनऊचा डाव -

यानंतर कर्णधार लोकेश राहुल आणि युवा फलंदाज आयुष बदोनी यांनी लखनऊच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलने या भागीदारीत काही चांगले फटके खेळले. ही जोडी मैदानावर टीकतेय असं वाटत असतानाच आंद्रे रसेलने लोकेश राहुलला बाद केलं. लोकेश राहुलने 27 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स लगावत 39 रन्स केल्या.

निकोलस पूरनमुळे लखनऊची सन्मानजनक धावसंख्या -

यानंतर लखनऊचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मधल्या फळीत निकोलस पूरनने केलेल्या फटकेबाजीमुळे लखनऊने निर्धारित ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 161 धावांपर्यंत मजल मारली. पूरनने 32 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्स लगावत 45 रन्स केल्या. KKR कडून मिचेल स्टार्कने ३ तर वैभव अरोरा, सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Advertisement

KKR ची ही अडखळती सुरुवात -

162 धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. पहिल्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केल्यानंतर मोहसीन खानने धोकादायक ठरु शकणाऱ्या सुनील नरीनला बाद केलं. यानंतर मैदानात आलेला अंगक्रीश रघुवंशीही फारशी चमक दाखवू शकला नाही. मोहसीन खाननेच त्याची विकेट घेतली.

अवश्य वाचा - IPL मॅचमध्ये श्रद्धा कपूरच्या डुप्लिकेटवर खिळल्या सर्वांच्या नजरा, व्हायरल फोटोवर अभिनेत्री म्हणाली, 'अरे ही तर...'

सॉल्टने सामना फिरवला, श्रेयस अय्यरचीही उत्तम साथ -

यानंतर सलामीवीर फिल सॉल्टने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने सामन्याचं पारडचं फिरवलं. दोघांनीही संघाची पडझड रोखत सामन्यावर आपली पकड बसवली. मैदानात पाय रोवल्यानंतर सॉल्टने फटकेबाजीला सुरुवात करत लखनऊला सामन्यात बॅकफूटवर ढकलण्यास सुरुवात केली. उर्वरित धावा पूर्ण करत अखेरीस या दोघांनीही KKR ला विजय मिळवून दिला. सॉल्टने 47 बॉलमध्ये 14 फोर आणि 3 सिक्स लगावत नाबाद 89 रन्स केल्या. त्याला श्रेयस अय्यरने 38 रन्सची संयमी खेळी करत चांगली साथ दिली.

Advertisement

Topics mentioned in this article