
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने T20 मुंबई लीगच्या बहुप्रतीक्षित तिसऱ्या सीजनसाठी अधिकृतपणे खेळाडूंची नोंदणी सुरू केली आहे. मुंबईतील उत्कृष्ट क्रिकेट कौशल्य दाखवण्यासाठी प्रसिद्ध असलेली ही लीग अनेक उगवत्या ताऱ्यांसाठी एक लाँचपॅड आहे. हे खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची आणि भव्य मंचावर छाप पाडण्याची संधी देते. शहराच्या विविध कानाकोपऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ संघांच्या सहभागासह आगामी सीजन 27 मेपासून सुरू होणार आहे.
16 वर्षांवरील सर्व MCA-नोंदणीकृत खेळाडूंसाठी नोंदणी खुली आहे.10 एप्रिलपूर्वी MCA च्या https://t20mumbai.mca-registration.com/ या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.
"खेळाडूंसाठी त्यांची प्रतिभा दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. अनेक अव्वल क्रिकेटपटूंनी या लीगद्वारे आपला ठसा उमटवला आहे आणि आम्ही खेळाडूंना या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. T20 मुंबई लीग शहरातील क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन टॅलेंट उदयास येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असे एमसीएचे सचिव अभय हडप यांनी सांगितले.
2018 मध्ये स्थापन झालेली टी20 मुंबई लीग ही भारतातील अग्रगण्य फ्रँचायझी-आधारित स्थानिक टी20 लीगपैकी एक म्हणून उदयास आली असून प्रतिभावान क्रिकेटपटूंना एक चांगले व्यासपीठ पुरवित आहे. या लीगमधून पुढे आलेल्या यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांसारख्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळवली आहे.
सहा वर्षांनंतर परत येत असलेला टी20 मुंबई लीगचा तिसरा सीझन शहरातील क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला पुनर्जीवित करण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धा 27 मेपासून सुरू होणार आहे. सीझन 3 मध्ये नॉर्थ मुंबई पँथर्स, ARCS अंधेरी, ट्रीम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट, नमो बांद्रा ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्राइकर्स, आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स आणि दोन नवीन संघ अशा आठ फ्रँचायझी असतील. नव्या भागधारकांसाठी या प्रतिष्ठित लीगचा अविभाज्य भाग होण्याची ही उत्कृष्ट संधी आहे.