रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकत समस्त भारतीयांना आनंदाचे क्षण दिले. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडचाही हा अखेरचा सामना होता. वर्ल्डकप जिंकून टीम इंडियाने राहुल द्रविडला विजयी निरोप देत त्याच्या कोच पदाच्या कार्यकाळाचा शेवट गोड गेला. टीम इंडियाच्या आगामी हेड कोच पदासाठी राहुल द्रविडने अर्ज दाखल केला नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर आणि डब्ल्यू.व्ही.रमन या दोघांचा अर्ज कोच पदासाठी दाखल झाला आहे. राहुल द्रविडने पुन्हा कोच पदासाठी अर्ज का दाखल केला नाही याचं कारण अखेरीस समोर आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती कारणांमुळे द्रविडने कोच पदासाठी अर्ज दाखल केला नाहीये. सामना संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
"त्याने मला सांगितलं की काही घरगुती जबाबदाऱ्यांमुळे तो अर्ज दाखल करु शकणार नाहीये आणि त्याच्या निर्णयाचा मला आदर आहे. त्याने अर्ज दाखल करावा यासाठी मी देखील जबरदस्ती केली नाही", असं जय शाह म्हणाले. यावेळी शाह यांनी भारतीय क्रिकेटसाठी राहुल द्रविडने एक खेळाडू, प्रशिक्षक म्हणून दिलेल्या योगदानाचंही कौतुक केलं.
हे ही वाचा - T-20 WC BLOG : रोहित नावाचं इमोशन
२०२३ वन-डे विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडचा मुळ करार होता. हा करार संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने त्याला टी-२० विश्वचषकापर्यंत मुदतवाढ जाहीर केली. याबद्दलचंही कारण जय शाह यांनी स्पष्ट केलं. "हा टी-२० विश्वचषक जिंकण्यात रोहित शर्माप्रमाणेच राहुल द्रविडचाही मोलाचा वाटा आहे. त्याच्यामुळेच आपण २०२३ च्या वर्ल्डकप फायनलपर्यंत पोहचलो होतो. त्याला काहीकेल्या वर्ल्डकप जिंकवून द्यायचा होता, यासाठी आम्ही त्याला मुदतवाढ जाहीर केली", असं जय शाह म्हणाले.
हे ही वाचा - टीम इंडियाला नवीन हेड कोच कधी मिळणार? जय शाह म्हणतात...
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौरा करणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ श्रीलंकेत ३ टी-२० आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल.