चिन्नास्वामीवर हैदराबादी फलंदाजांचं वादळ, उभारली IPL मधली सर्वोच्च धावसंख्या

RCB च्या गोलंदाजांची धुलाई करत सनराईजर्स हैदराबादने उभी केली 287 धावांची टोटल. SRH कडून ट्रॅविस हेड, हेन्रिच क्लासेन यांची आक्रमक फटकेबाजी...RCB चे गोलंदाज सपशेल अपयशी

जाहिरात
Read Time: 2 mins
Travis Head च्या शतकामुळे RCB घायाळ (फोटो सौजन्य - IPL)
बंगळुरु:

आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर घरच्या मैदानावर खेळताना RCB चा संघ आज सपशेल अपयशी ठरला आहे. सनराईजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी RCB च्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत चौफेर फटकेबाजी करत 287 धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. हैदराबादकडून ट्रॅविस हेडने 41 बॉलमध्ये 9 फोर आणि 8 सिक्स लगावत 102 रन्स केल्या. त्याला हेन्रिच क्लासेन, एडन मार्क्रम, अब्दुल समद यांनी उत्तम साथ दिली.

टॉस जिंकून RCB चा कर्णधार फाफ डुप्लेसिसने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. परंतु त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीने सुरुवातीपासूनच चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. चिन्नास्वामीच्या मैदानावर यानंतर हैदराबादी फलंदाजांनी चौकार-षटकारांची जी आतिषबाजी सुरु केली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही.

हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यासाठी RCB चा कर्णधार फाफ डु-प्लेसिसने हरएक प्रकारे प्रयत्न करुन पाहिले. परंतु त्याला यश आलं नाही. RCB चा प्रत्येक गोलंदाज या सामन्यात महागडा ठरला. इंग्लंडच्या रिस टोपलेवर हैदराबादचे फलंदाज सर्वाधिक तुटून पडले. टोपलेच्या 4 ओव्हर्समध्ये हैदराबादने 68 रन्स कुटल्या. RCB कडून लॉकी फर्ग्युसनने दोन तर टोपलेने १ विकेट घेतली.

Advertisement

महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या हंगामात सनराईजर्स हैदराबादने दुसऱ्यांदा आपणच सेट केलेला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना हैदराबादच्या फलंदाजांनी अशीच आक्रमक खेळी करत 277 धावा केल्या होत्या. RCB विरुद्ध सामन्यात हैदराबादचे फलंदाज काही पावलं पुढे गेले.

अवश्य वाचा - टी-20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर हार्दिक भारतीय संघात हवाच, इंग्लंडच्या माजी कॅप्टनची पांड्यासाठी बॅटींग

Topics mentioned in this article