भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आणि 'मिस्टर 360' म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी आई-बाबा झाले आहेत. देविशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, सूर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गुरुवारी सूर्याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. सूर्या-देविशाच्या संसाराच्या वेलीवर फुल उमलल्याने यादव आणि शेट्टी कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.
सूर्यकुमार आणि देविशा यांची ओळख मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात झाली होती. देविशाच्या नृत्याने घायाळ झालेला सूर्या तिच्या प्रेमात पडला होता. 7 जुलै 2016 रोजी हे दांपत्य विवाहबंधनात अडकले. सुर्याच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीत देविशाचा मोलाचा वाटा असल्याचे सूर्याने अनेकदा मान्य केले आहे. मार्च महिन्यात त्यांच्या बेबी शॉवरचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच चाहत्यांना या आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा होती.
सध्या आयपीएल 2026 चा हंगाम सुरू असून सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, यंदा त्याची बॅट काहीशी शांत असून 10 सामन्यांत त्याने केवळ 195 धावा केल्या आहेत. 10 मे रोजी रायपूर येथे होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यासाठी सूर्या अद्याप टीमसोबत रवाना झालेला नाही. पितृत्वाचा आनंद घेण्यासाठी त्याने हा ब्रेक घेतल्याचे समजते.
आयपीएल मध्ये सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला असला, तरी वैयक्तिक आयुष्यात त्याच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट घडली आहे. त्याची पत्नी देविशाने गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती मिळताच क्रिकेट विश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मार्च महिन्यात झालेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच सूर्या लवकरच बाबा होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता या जोडप्याचे कुटुंब दोनचे तीन झाले आहे. आपल्या लेकीच्या जन्मामुळे सूर्यकुमार या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासोबत असून त्याने अद्याप रायपूर गाठलेले नाही. चाहत्यांना आता मैदानावर पुन्हा जुना 'सूर्या' तळपताना पाहण्याची ओढ लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world