चेन्नई कसोटीत भारताची बांगलादेशवर मात, रविचंद्रन आश्विनची अष्टपैलू खेळी

भारतीय संघ संकटात असताना आश्विनने पहिल्या डावाता शतक झळकावून दुसऱ्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला

Advertisement
Read Time: 3 mins
चेन्नई:

मोठ्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे रेड बॉल क्रिकेटच्या हंगामाला जोरदार सुरुवात केली आहे. चेन्नई कसोटीत बांगलादेशवर २८० धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात निम्मा संघ गारद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आश्विनव्यतिरीक्त भारताकडून फलंदाजीत रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी आपली चमक दाखवली. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, सिराज यांनीही आपला दमखम दाखवला.

पहिल्या डावात भारताची खराब सुरुवात -

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळालेल्या भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली हे आघाडीच्या फळीतले तीन महत्वाचे शिलेदार स्वस्तात माघारी परतले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतकी खेळी करत ऋषभ पंतच्या साथीने भारताचा डाव सावरला. यशस्वी जैस्वाल ५६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर पंतही ३९ धावा काढून बाद झाला.

आश्विनने सावरला भारताचा डाव -

६ बाद १४४ अशा बिकट अवस्थेत अडकलेल्या भारतीय संघाला नंतर आश्विन आणि जाडेजा या जोडीने सावरलं. दोघांनीही सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी करत बांगलादेशला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. आश्विनने यादरम्यान आपलं शतक साजरं केलं. जाडेजा मात्र ८६ धावा काढून बाद झाला. आश्विनने १३३ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार लगावत ११३ धावा केल्या. यानंतर भारताच्या उर्वरित फलंदाजांनी फारशी झुंज दिली नाही. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ३७६ धावांपर्यंत मजल मारली.

बांगलादेशकडून पहिल्या डावात हसन महमुदने ५ विकेट घेतल्या. त्याला तस्कीन अहमदने ३ तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराझ १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.

हे ही वाचा - Ashwin: घरच्या मैदनावर अश्विननं घडवला इतिहास, 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू

चेन्नईच्या खेळपट्टीवर भारतीय फास्ट बॉलर्सचा दबदबा - 

चेन्नईची खेळपट्टी ही स्पिनर्सना मदत करणारी असते हा सर्वसामान्य प्रघात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात खोटा ठरवला. सलामीवीर शादमन इस्लाम आणि झाकीर हसन ही जोडी स्वस्तात माघारी परतली. यानंतर बांगलादेशच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. मधल्या फळीत शाकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराझ यांनी दिलेल्या झुंजीमुळे बांगलादेशचा संघ शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडू शकला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप या फास्ट बॉलर्सच्या त्रिकुटाने बांगलादेशचा निम्मा संघ माघारी धाडला. पहिल्या डावात पाहुण्या संघाला १४९ धावांत गुंडाळल्यामुळे फॉलोऑन देण्याची संधी भारताकडे होती. परंतू कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात फलंदाजी करणं पसंत केलं.

दुसऱ्या डावातही अनुभवींची निराशा, पंत-गिलची शतकी खेळी -

दुसऱ्या डावातही भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली. विराट कोहलीने थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु मेहदी हसन मिराझच्या गोलंदाजीवर त्याला वादग्रस्त पद्धतीने बाद देण्यात आलं. यानंतर पंत आणि गिलने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेत बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई केली. ऋषभ पंतने १०९ तर शुबमन गिलने नाबाद ११९ धावा केल्या. अखेरीस रोहित शर्माने भारताचा दुसरा डाव ४ बाद २८७ वर घोषित करत बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचं मोठं आव्हान दिलं.

दुसऱ्या डावात आश्विनच्या फिरकी जाळ्यात अडकले बांगलादेशी वाघ -

डोंगराएवढं आव्हान मिळालेल्या बांगलादेशने दुसऱ्या डावात तुलनेने चांगली सुरुवात केली. झाकीर हसन आणि शादमन इस्लाम यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने झाकीर हसनला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर ठराविक अंतराने भारतीय गोलंदाज बांगलादेशच्या संघाला धक्के देत राहिले. बांगलादेशी कर्णधार नजीमउल हुसैन शांटोने ८२ धावांची खेळी करत झुंज दिली. परंतु आश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर चौथ्या दिवशी बांगलादेशी फलंदाज फारकाळ तग धरु शकले नाहीत आणि दुसरा डाव २३४ धावांत आटोपल्यामुळे भारताने मोठा विजय संपादन केला.

हे ही वाचा - IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video

भारताकडून दुसऱ्या डावात आश्विनने ६ विकेट घेतल्या, त्याला जाडेजाने ३ तर बुमराहने १ विकेट घेत चांगली साथ दिली. शतकी खेळी आणि ६ विकेट या कामगिरीसाठी आश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.