Women's T-20 World Cup : भारताची पाकिस्तानवर मात, 6 विकेटने उडवला धुव्वा

भारतीय महिलांनी केलेल्या या संथ खेळाचा त्यांना सेमी फायनलच्या शर्यतीत फटका बसू शकतो.

Advertisement
Read Time: 3 mins
दुबई:

संयुक्त अरब अमिरात येथे सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ विकेट राखून मात केली आहे. सलामीचा सामना गमावलेल्या भारतीय महिला संघाने या सामन्यात विजय मिळवला असला तरीही १०६ धावांचं माफक आव्हान पूर्ण करायला भारतीय महिलांना १९ व्या षटकाची वाट पहावी लागली.

भारतीय महिलांनी केलेल्या या संथ खेळाचा त्यांना सेमी फायनलच्या शर्यतीत फटका बसू शकतो. १९ धावा देऊन ३ विकेट घेणारी अरुंधती रेड्डी प्लेअर ऑफ द मॅच ठरली.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानची प्रथम फलंदाजी -

रेणुका सिंगने पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गुल फेरोझाला बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच पाकिस्तानची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली होती. आघाडीच्या फळीतील मुबीना अली आणि निदा दार यांनी एकाकी झुंज देत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

भारतीय महिलांचा प्रभावी मारा -

भारतीय महिलांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव सावरलाच नाही. मुबीना आणि निदा दार यांच्याव्यतिरीक्त अखेरच्या फळीत फातिमा सना आणि सयेदा अरुब शाहा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानी महिला संघ शतकीपार धावसंख्येचा टप्पा ओलांडला. निर्धारित षटकांत पाकिस्तानी महिला संघाने ८ विकेट गमावत १०५ धावांपर्यंत मजल मारली.

भारतीय महिला संघाकडून अरुंधती रेड्डीने प्रभावी मारा करत ३ विकेट घेतल्या. त्याला श्रेयांका पाटीलने २ तर रेणुका सिंग आणि दिप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी १-१ विकेट घेतल्या.

भारतीय संघाचीही खराब सुरुवात -

शफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने काहीसा संथ खेळ केला. सादिया इक्लाबलने स्मृती मंधानाला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी काही आश्वासक फटके खेळत भारतीय महिला संघाचा डाव सावरला. दोघींनीही दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली.

ही जोडी भारतीय संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातेय असं वाटत असतानाच ओमानिया सोहेलने शफाली वर्माला माघारी धाडलं. शफालीने ३२ धावा केल्या.

हे ही वाचा - मुंबईनं कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव, 27 वर्षांचा दुष्काळ संपवण्यात अजिंक्यच्या टीमला यश

मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला धक्के -

यानंतर जेमिमा रॉड्रीग्जने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने भारताची बाजू पुन्हा एकदा वरचढ केली. या दोघींमध्येही १९ धावांची भागीदारी झाल्यानंतर फातिमा सनाने जेमिमाला बाद केलं. जेमिमाने २३ धावा केल्या. यानंतर मैदानात आलेली रिचा घोषही भोपळा न फोडता माघारी परतली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने एक बाजू लावून धरत भारताला विजयाच्या जवळ आणलं. परंतु विजयापासून दोन धावा असताना दुखापतीमुळे हरमनप्रीतला माघारी परतावं लागलं. हरमनप्रीतने २९ धावा केल्या. अखेरीस दिप्ती शर्मा आणि एस. संजना यांनी भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळाला असला तरीही त्यांना उर्वरित सामन्यांत विजय मिळवून इतर संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे.