राज्यभरातील महिला अत्याचाराच्या घटना ताज्या असताना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका 16 वर्षी मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तरुण मुलीला त्रास देत असल्याची माहिती आहे. तरुणाकडून दिल्या जाणाऱ्या धमकीमुळे मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' अशी धमकी आरोपीच्या भावाकडून पीडितेच्या कुटुंबीयांना दिली जात आहे. आरोपींच्या कुटुंबीयांची ही मुजोरी पाहून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमधून निषेध व्यक्त करण्यात आला. संभाजीनगरमध्ये याविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आणि या घटनेत दोषीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संभाजीनगरच्या ओव्हर गावात घडली. पूजा शिवराज पवार (16) असं मृत तरुणीचं नाव आहे. 'तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन,' अशी धमकी पूजाला दिली जात होती. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून पूजाने टोकाच पाऊल उचललं असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
नक्की वाचा - 'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप
जो तरुण पूजाला त्रास देत होता, त्याचं नाव कासीम पठाण असं आहे. कासीमसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आरोपीला अटक केल्यानंतर देखील त्याच्या कुटुंबीयांकडून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' असं म्हणत चाकू, तलवार दाखवून आरोपीच्या भावाकडून धमकी दिल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world