राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Online Fraud Crime : ऑनलाईन शेअर मार्केट व गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 31 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नवीन पनवेल येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4),316(2),3(5) आयटी अॅक्ट 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रश्मि पुनिया व यतीन शाह अशी आरोपींची नावं असून ते फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रश्मि पुनिया व यतीन शाह यांनी फिर्यादी हरेंद्र शिंग (55) यांना मोबाईलवरून संपर्क साधून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे सांगून विविध लिंक पाठवत टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. 1 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान फिर्यादींकडून 31.50 लाख रुपये उकळण्यात आले. नंतर रक्कम परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्हेगार नवीन युक्त्या वापरून नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याने आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नक्की वाचा >> Navi Mumbai News : नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भयंकर घटना, शहरातील नागरिकांसह प्रवाशांनी वेळीच सतर्क राहा
नागरिकांनी काय काळजी घ्यावी? पोलिसांनी दिल्या सूचना
- अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या गुंतवणुकीच्या ऑफरवर विश्वास ठेवू नये.
- व्हॉट्सअॅप/टेलिग्राम ग्रुपद्वारे शेअर मार्केटमध्ये हमखास नफा देण्याच्या दाव्यांपासून सावध राहावे.
- कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी कंपनीची अधिकृत वेबसाइट तपासावी.
- SEBI नोंदणीकृत सल्लागारांकडूनच गुंतवणूक सल्ला घ्यावा.
- संशयास्पद व्यवहार झाल्यास त्वरित १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world