
राहुल कांबळे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा इतर देशांतून वळसा घालून येणाऱ्या मालाच्या आयातीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत 1,115 मेट्रिक टन वजनाचा, सुमारे 9 कोटी रुपये किमतीचा पाकिस्तानातून आलेला माल जप्त केला आहे. हे 39 कंटेनर्स Nhava Sheva बंदरावर पकडले गेले आहेत. शिवाय या प्रकरणी एका आयातदार कंपनीच्या भागीदारास ही अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2 मे 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातून थेट अप्रत्यक्ष मार्गाने येणाऱ्या मालाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. यापूर्वी अशा मालावर 200 टक्के सीमा शुल्क आकारण्यात येत होता. मात्र, ही बंदी झुगारून काही आयातदार दुबईमार्गे पाकिस्तानातून माल आणत होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याचे मूळ ‘यूएई' असे भासवले जात होते. पण यावेळी त्यांचा डाव फसला. हा माल पकडण्यात आला.
ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
या प्रकरणात DRI च्या तपासात असे स्पष्ट झाले की, पकडलेला माल पाकिस्तानातील कराची बंदरातून दुबईतील जाबेल अली पोर्टवर नेण्यात आला. तेथून दुसऱ्या जहाजांमधून आणि दुसऱ्या कंटेनर सेटमधून भारतात पाठवण्यात आला. ज्या कंटेनरवर यूएई इथून हा माल आला असल्याचे दाखवले होते. प्रत्यक्षात तो माल पाकिस्तानातून आलेला होता. या व्यवहारांमध्ये पाकिस्तानी आणि यूएई नागरिकांचा समावेश असून, बनावट शिपिंग डॉक्युमेंट्स तयार करून मूळ देश लपवण्याचा प्रयत्न झाला आहे.
या तपासादरम्यान DRI ला काही महत्त्वाच्या आर्थिक पुराव्यांची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानमधील संस्थांशी आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे अवैध आर्थिक प्रवाह (illicit financial flows) आणि भारताच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. DRI ने यापूर्वीही ‘ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत अशा प्रकारच्या आयात नियंत्रणासाठी अनेक कारवाया केल्या होत्या. आता ‘डीप मॅनिफेस्ट'च्या माध्यमातून अशा प्रकारच्या तस्करीवर आणखी लक्ष ठेवले जात आहे. गुप्तचर माहिती, डेटा अॅनालिटिक्स आणि इतर एजन्सींसोबत समन्वय ठेवत DRI हे सर्व व्यवहार हेरून कारवाई करत आहे.
‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' ही कारवाई केवळ सीमा शुल्क कायद्याचे पालन नाही तर देशाच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करणारी ठरली आहे. DRI च्या या धडाकेबाज तपासामुळे अशा आयातदारांना मोठा धक्का बसला असून, भविष्यात कोणताही माल पाकिस्तानातून दुबई किंवा इतर तृतीय देशांतून वळसा घालून आणण्याचा प्रयत्न झाला, तर त्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईद्वारे मिळाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world