अमजद खान, कल्याण
मॅट्रोमोनियल ॲपवर तरुणीची फसवणूक झाल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. भामट्याने ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत इंजिनिअर तरुणीकडून जवळपास 60 लाख रुपये उकळले. खडकपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तरुणीची फसवणूक करणाऱ्या कुणाल पाटील नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कुणालने या आधीही नाशिकमध्ये असाच प्रकार केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. धक्कादायक म्हणजे तरुणी त्याला कधी प्रत्यक्षात भेटली नाही. केवळ ऑनलाइनच्या माध्यमातून त्यांचा संपर्क होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत एक तरुणी राहते. ती एका खाजगी कंपनीत काम करते. काही महिन्यापूर्वी मॅट्रोमोनियल ॲपद्वारे या तरुणीची कुणाल पाटील नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. दोघेही ऑनलाईन एकमेकांशी संपर्कात होते. त्यानंतर कुणालने त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि आणखी जवळीक निर्माण केली. मुलीला विश्वासात घेतल्यानंतर काही तरी कारण देत कुणाल याने तिच्याकडे पैशीची मागणी केली. आपण लग्न करणार आहोत या विचारात असलेल्य तरुणीने मागेल तेवढे पैसे या भामट्याला देऊन टाकले. त्यासाठी तिने कर्ज देखील काढले होते.
(नक्की वाचा - छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?)
कुणालने तिला आश्वासन दिलं होतं की, कर्जाच्या रक्कमेचा हप्ता मी भरेन. पण काही दिवसांनी त्याने कर्जाच्या हफ्त्याची रक्कमच भरली नाही. तरुणीने त्याच्याकडे तगादा लावला. पैसे कधी भरणार आहे. मात्र त्याने कारणे देत पैसे भरण्यास टाळाटाळ केली. अखेर तरुणीच्या लक्षात आले की कुणाल तिची फसवणूक करत आहे. कुणालने तिच्याकडून जवळपास 60 लाख रुपये उकळले होते. खडकपाडा पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
(नक्की वाचा- सलमान खानच्या घरावर गोळी चालवणारा 'मामा' कोण? मुंबई पोलिसांसमोर नवी डोकेदुखी )
आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक अनेक ठिकाणी गेले. अखेर त्याला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून अटक केली. कुणालच्या विरोधात नाशिकमध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. कुणालने अन्य किती तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवले याचा तपासही पोलीस घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world