साजन ढाबे, प्रतिनिधी
Washim Crime News Today : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडल्या आहेत. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने मिटकरी यांना रंगेहाथ पकडलं.विकासकामाच्या बिलाशी संबंधित प्रकरणात 4 लाख 25 हजार रुपयांच्या कामासाठी 10 टक्के रकमेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदाराने केलेल्या विकासकामाच्या मोबदल्यात सरपंच सुनीता मिटकरी यांनी 45 हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.एसीबीच्या पथकाने 3 जून रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली आणि त्यानुसार सत्य समोर आलं.
या कारवाईमुळे ढोरखेडा परिसरात खळबळ उडाली
पडताळणीनंतर 4 जून रोजी एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन केले.ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने सरपंचांना लाचेची रक्कम दिली.एसीबीच्या पथकाने तत्काळ छापा टाकून त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.या कारवाईमुळे ढोरखेडा परिसरात एकच खळबळ उडाली.ही कारवाई सुरू असताना ढोरखेडा ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'अंतर्गत आलेले उच्चस्तरीय तपासणी पथक ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे मूल्यमापन करत होते.
नक्की वाचा >> Solapur News: सोलापूरच्या राजकारणात नवा ट्वीस्ट, NCP चे उमेदवार वसंत देशमुखांच्या एका भेटीमुळे चर्चांना उधाण
ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची, प्रशासनाची आणि पारदर्शकतेची तपासणी सुरू असतानाच एसीबीची कारवाई झाल्याने उपस्थित अधिकारी आणि ग्रामस्थांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.ढोरखेडा ग्रामपंचायत ही जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.विविध विकासकामे,स्वच्छता उपक्रम आणि प्रशासनातील कार्यपद्धतीमुळे या ग्रामपंचायतीने विशेष ओळख निर्माण केली होती.
राजकीय,सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मात्र सरपंचांवर झालेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.दरम्यान,एसीबीच्या कारवाईनंतर संबंधितांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Pune News: इंचभरही जमीन देणार नाही, त्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, पुरंदरमध्ये शिवसृष्टी उभारण्याची मागणी
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या कारवाईची बातमी जिल्हाभर वेगाने पसरली असून राजकीय,सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world