- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नवी मुंबईत मोठी कारवाई करत जीएसटी (व्यवसाय कर) विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह त्याच्या महिला साहाय्यकाला रंगेहात अटक केली आहे. थकीत कर प्रकरणाची फाइल बंद करण्यासाठी लाचेची मागणी करणे या अधिकाऱ्यांच्या अंगलट आले असून 6 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
कोपरखैरणे येथील एका 28 वर्षीय तरुणाचा सॉफ्टवेअर आणि वेबसाइट डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाला जीएसटी विभागाकडून PTEC आणि PTRC संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी तक्रारदार बेलापूर येथील कार्यालयात गेले असता, तेथील व्यवसाय कर अधिकारी अमित भानुदास गिरी याने साहाय्यक वैशाली कदम हिची भेट घेण्यास सांगितले.
(नक्की वाचा: Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराशेजारी माथेफिरूचा धुमाकूळ, 10-12 गाड्या फोडल्या; ठाणेकर दहशतीत)
लाचेची मागणी आणि तडजोड
तपासादरम्यान वैशाली कदम हिने तक्रारदाराकडे एकूण 23,900 रुपये भरण्याची मागणी केली. यापैकी 13,900 रुपये हे अधिकृत शुल्क होते, पण उर्वरित 10,000 रुपये फाइल क्लोज करण्यासाठी लाच म्हणून मागण्यात आले. भ्रष्टाचाराचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने 2 एप्रिल रोजी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत लाचेची रक्कम 7,000 रुपये ठरवण्यात आली.
सापळा रचून रंगेहात अटक6 एप्रिल रोजी एसीबीच्या पथकाने बेलापूर येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळेस वैशाली कदम हिने नोंदणीच्या नावाखाली अतिरिक्त 2,000 रुपयांची मागणी करून ती स्वीकारली. त्यानंतर मुख्य आरोपी अमित गिरी याने आपल्या केबिनमध्ये 7,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले. संध्याकाळी 6:35 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबई हादरली! मध्यरात्री बाइकवरून आला, एकावर 4 गोळ्या झाडल्या अन्... ऐरोलीत दहशत)
पुढील कायदेशीर कारवाईएसीबीने आरोपींची अंगझडती घेऊन त्यांचे मोबाइल फोन आणि लाचेची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच अमित गिरीच्या निवासस्थानीही घराची झडती (Search Operation) घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या कलम 7, 7(A) आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या मोहिमेवर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांनी देखरेख ठेवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world