- राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे १५ जणांनी पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला केला
- आरोपी दारूच्या नशेत होते त्यांनी लोखंडी गज, लाकडी दांडा आणि लाथा बूक्क्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाण केली
- हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांनी ट्रक चालकाला मारहाण करण्यापासून मज्जाव केला होता
सुनिल दवंगे
राहुरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करण्यात येत होती. त्याच वेळी तिथे असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने ह वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर हे नशेत होते. त्यांना पोलीसांनी मज्जाव केल्याचा राग त्यांनी मनात धरला. त्यानंतर संधी साधून जवळपास 15 जणांनी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यांना लोखंडी गज, लाकडी दांडा आणि लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना डिग्रस फाटा येथे रात्रीच्या वेळी घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे ही घटना घडली आहे. इथं 10 ते 15 जणांचे टोळके होते. ते दारुच्या नशेत होते. त्यांच्या कारला ट्रकने कट मारला याचा राग त्यांना आला. त्यांनी या ट्रक चालकाला गाठून लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे जात होते. त्यांनी हा प्रकार पाहीला.
त्यावेळी त्यांनी या आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री 11.30 वाजता राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत होते. त्या ठिकाणी तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पुन्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा
त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, तसेच महेश निमसे आणि अनोळखी 11 जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world