योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र या प्रेमाला विरोध झाला तर काही तरुण-तरुणी जीवाचीही पर्वा न करता टोकाचं पाऊल उचलतात. अकोल्याच्या काटी पाटी ते दहीहंडा येथे असाच एक प्रकार घडला आहे. “करिष्मा, तुझी आठवण खूप सतावत होती… बाय… तुझ्याशिवाय जगू शकत नाही,” असा भावनिक संदेश देत एका तरुणाने इंस्टाग्रामवर रील पाठवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात उघडकीस आली.
काटी पाटी ते दोनवाडा शेतशिवारातील नेटवर्कमध्ये एका आदिवासी इसमाने प्रेमप्रकरणातून विषप्राशन करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. या तरुणाने विषप्राशन करतानाचा व्हिडिओ आपल्या प्रेयसीला शेअर केल्याची माहिती समोर आली. काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि या घटनेने एकच खळबळ उडाली.
सायबर सेलची सतर्कता आणि पोलिसांची धावपळ..
यादरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अकोला सायबर सेलच्या तत्काळ निदर्शनास आला. सायबर टीमने वेळ न दवडता अकोल्याच्या दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल लांडगे, पोलीस कर्मचारी दळवी तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत चव्हाटे यांनी परिसरातील नेटवर्कचा वापर करत तातडीची शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान दोनवाडा येथील गजानन झटाले यांच्या शेतात संबंधित युवकाने विषप्राशन केल्याचे आढळून आले.
20 मिनिटांत रुग्णालयात दाखल; तरुणाचे प्राण वाचले
अकोला पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे अवघ्या 20 मिनिटांत संबंधित युवकाला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने युवकाचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेळेवर कारवाई, समन्वय आणि मानवी संवेदनशीलतेचे हे उदाहरण ठरले आहे. एका युवकाचा जीव वाचवल्यामुळे अकोला सायबर सेल व दहीहंडा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियाच्या गैरवापराचे धोके आणि पोलिसांच्या सतर्कतेचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
