जाहिरात

Pune News: आजोबाच झाला हैवान, 'ते' भूत डोक्यात गेलं आणि 6 वर्षांच्या नातीसह 2 जणांची हत्या केली !

Alandi Double Murder Case  : आळंदीतील ठाकरवस्ती परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे.

Pune News: आजोबाच झाला हैवान, 'ते' भूत डोक्यात गेलं आणि 6 वर्षांच्या नातीसह 2 जणांची हत्या केली !
Alandi Double Murder Case : आळंदीच्या दुहेरी हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
पिंपरी चिंचवड:

सुरज कसबे, प्रतिनिधी 


Alandi Double Murder Case  : आळंदीतील ठाकरवस्ती परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. येथील एका 6 वर्षांच्या चिमुकलीचा आणि तिला सांभाळणाऱ्या 70 वर्षांच्या वृद्धेचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या सावत्र आजोबानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी विनायक तुकाराम भवारी याला अवघ्या काही तासांत आळेफाटा येथून बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील मुख्य आरोपी विनायक भवारी याचे संगीता केदारी यांच्याशी दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने विनायक वेगळा राहत होता. शेजारी राहणाऱ्या 70 वर्षांच्या मंगल शिंदे या पत्नी संगिताला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय विनायकच्या मनात होता. याच रागातून 1 एप्रिल 2026 च्या रात्री जेव्हा संगीता हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, तेव्हा विनायकने संधी साधली. त्याने प्रथम मंगल शिंदे यांची हत्या केली आणि त्यानंतर आपली ओळख पटेल या भीतीने, निष्पाप 6 वर्षांच्या धनश्रीचाही गळा आवळून खून केला.

( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
 

कसा झाला उलगडा?

संगीता केदारी या गुरुवारी सकाळी आपल्या नातीला घरी नेण्यासाठी मंगल शिंदे यांच्या घरात गेल्या असता, त्यांना दोघी मृतावस्थेत पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित विनायकचा शोध सुरू केला. 

तो आळेफाटा परिसरात पळून गेल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

( नक्की वाचा : Dombivli: जामिनावर सुटला अन् थेट जत्रेत पिस्तूल काढून रिल बनवलं; डोंबिवलीच्या रिलस्टारचा पोलिसांनी उतरवला माज )

हृदयद्रावक कौटुंबिक पार्श्वभूमी

मयत धनश्रीची कहाणी अत्यंत दुःखद आहे. तिच्या वडिलांचे आणि काकांचे आधीच निधन झाले होते, तर तिची आई तिला सोडून निघून गेली होती. अशा परिस्थितीत तिची आजी संगीता केदारी या तिचा जीव लावून सांभाळ करत होत्या. त्या कामावर गेल्या की शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे धनश्रीची काळजी घेत असत. ज्या नात्याने तिला संरक्षण द्यायला हवे होते, त्याच नात्याने तिचा घात केल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक गोसावी यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com