जाहिरात

Amravati News : चुंबन घेऊन फोटो काढला अन् घात झाला; सोशल मीडियावरील ओळखीतून अत्याचाराची धक्कादायक घटना

सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर अत्याचारात झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

Amravati News : चुंबन घेऊन फोटो काढला अन् घात झाला; सोशल मीडियावरील ओळखीतून अत्याचाराची धक्कादायक घटना
AI Image

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News : सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर अत्याचारात झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशन बेनोडा येथे २६ एप्रिल २०२६  रोजी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आईसह येऊन तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथून आरोपीला जेरबंद केलं. परतवाड्यानंतर आता बेनोडाच्या या प्रकरणाने अमरावती जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर मागील दोन वर्षांपूर्वी बाबू हसन (वय २२, रा. मुरादाबाद, उत्तर प्रदेश)  याच्याशी ओळख झाली होती. दोन वर्षे चॅटिंग सुरू असताना पीडितेने एक फोटो आरोपीला पाठवला होता. जानेवारी २०२६ मध्ये दोघे नागपूर येथे भेटले असता आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचं चुंबन घेऊन त्याचा फोटो काढला. एप्रिल महिन्यात दोघांमध्ये वाद झाल्याने पीडितेने आरोपीला सर्व ठिकाणी ब्लॉक केले. यातून संतापलेल्या आरोपीने पीडितेच्या आईला फोन करून तुमच्या मुलीचा टॅब काढून घ्या असं सांगितलं. आईनेही त्याला ब्लॉक केल्यानंतर आरोपीने थेट आजीला पीडितेचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. 

नक्की वाचा - Kalyan News : लाडकी बहीण योजनेच्या KYC च्या नावाखाली घृणास्पद प्रकार; महिलांना सावध राहण्याचं आवाहन

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न 

हे प्रकरण उघडकीस येताच पीडितेने आईसह पोलीस स्टेशन गाठलं. बेनोडा पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून कलम ७४, ७५(१)(२), ७८(२), ७९, ३५१(२) पोस्को कलम ८, १२ IT कायदा  कलम ६७(A) आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आले होते. त्यानुसार आरोपी मुरादाबादला नसून हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील एका कारखान्यात काम करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट तिकडे धाव घेत ३० एप्रिल रोजी त्याला अटक केली. न्यायालयाने २ मे २०२६ पर्यंत PCR मंजूर केला होता. त्यानंतर आरोपी MCR मध्ये कारागृहात आहे.

आरोपीकडून दोन मोबाईल तसेच पीडितेच्या आजीचा एक मोबाईल जप्त करण्यात आला. त्यात वरील फोटो आढळले असून इतर कोणतेही आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ आढळले नाहीत. तरीही तिन्ही मोबाईल न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची धग अद्याप ओसरलेली नाही, त्यातच बेनोडाच्या या प्रकरणाने जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क किती धोकादायक असतो हे या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. गुन्हा नोंद होताच तत्काळ आरोपीला अटक करण्यात आली असून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com