
दिल्लीत 17 विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप असलेला स्वयंघोषित बाबा चैतन्यानंद सरस्वती याला पतियाळा हाऊस न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की, चैतन्यानंद हा केवळ कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड करत नव्हता, तर त्यांना धमकावत होता. त्यांना अश्लील संदेश पाठवत होता. त्याने अनेक विद्यार्थिनींच्या बाथरूममध्ये कॅमेरे बसवले होते. हे कॅमेरे त्याच्या मोबाईल फोनशी जोडलेले होते. त्यामुळे तो त्याच्या सहाय्याने या मुलींना बघायचा असं ही समोर आलं आहे.
दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी आग्रामधून अटक केलेल्या 62 वर्षीय चैतन्यानंदला दुपारी सुमारे 3:40 वाजता ड्यूटी मॅजिस्ट्रेट रवी यांच्यासमोर हजर केले. चैतन्यानंदने अनेक विद्यार्थिनींची छेडछाड केली. त्यांच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. असा आरोप करण्यात आला आहे. पीडितांनी त्यांच्या जबाबात या आरोपांना दुजोरा ही दिला आहे. चैतन्यानंद विद्यार्थिनींना धमक्या देत असे. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. 16 विद्यार्थिनींनी तक्रारी नोंदवल्या असून, इतर अनेक आरोपांची पुष्टी करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असं कोर्टात सांगण्यात आलं.
चैतन्यानंदच्या वकिलांनी कोठडीत चौकशीच्या मागणीला विरोध करताना सांगितले की, सर्व 16-20 विद्यार्थिनींनी त्यांचे जबाब आधीच नोंदवले आहेत. वकिलांनी आरोप केला की, त्यांचे अशिल मधुमेहाने त्रस्त आहेत. पोलीस त्यांना योग्य वागणूक देत नाहीत. तसेच त्यांचे भिक्षुचे कपडे काढून घेतले आहेत. पोलिसांनी केवळ त्रास देण्यासाठी कोठडीची मागणी केली आहे. यावर तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आरोपीला पीडितांचे जबाब आणि डिजिटल पुराव्यांसह सामोरे आणण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे.
पोलिसांनी सांगितले की, चैतन्यानंद हा दोन महिन्यांत पहिल्यांदाच तपासात सामील झाला आहे. तो सहकार्य करत नाही. त्याने त्याच्या आयपॅड आणि आयक्लाउडचे पासवर्डही दिलेले नाहीत. एका साक्षीदाराला उचलून नेण्याची धमकी देण्यात आली होती. तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून, त्यात छेडछाड होण्याचा धोका आहे असं पोलीसांनी सांगितलं. यापूर्वीच, पोलिसांनी चैतन्यानंदच्या बँक खात्यांमधील आणि एफडीमधील कोट्यवधी रुपये जप्त केले होते. तपासात आरोपीने वेगवेगळ्या नावाने अनेक बँक खाती उघडल्याचे उघड झाले. एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याने 50 लाख रुपयांहून अधिक रक्कम काढली होती. तसेच, त्याच्याजवळ संयुक्त राष्ट्र (UN) आणि ब्रिक्सशी (BRICS) संबंध दर्शवणारे बनावट व्हिजिटिंग कार्ड देखील पोलिसांना मिळाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world