Badlapur News : मुंबईत हक्काचं घर मिळण्यापूर्वीच बदलापूरकराचं मनोधैर्य खचलं; सरकारी कर्मचाऱ्यासोबत भयंकर घडलं

मुंबईत म्हाडामध्ये घर मिळवून देतो असं आमिष दाखवत एका रेल्वे कर्मचाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Badlapur News : मुंबईत म्हाडामध्ये घर मिळवून देतो असं आमिष दाखवत एका रेल्वे कर्मचाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बदलापूरमध्ये राहणारे रेल्वे कर्मचारी दीपक ठाकरे यांनी शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच म्हाडा प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईत घर देतो सांगून १८ लाख घेतले अन्....

मुंबई येथील म्हाडामध्ये एक घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दीपक ठाकरे यांना मिळाली होती. त्यानंतर संदीप पवार नावाच्या व्यक्तीने त्यांची घरमालक नारायण कदम यांच्याशी ओळख करून दिली. घर खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत नारायण कदम यांनी दीपक ठाकरे यांच्याकडून ११ लाख रुपये घेतले. संदीप पवार याच्या सांगण्यावरून राजू गावठे नावाच्या व्यक्तीने वेळोवेळी पैसे घेतले. राजू गावठे यांनी दीपक ठाकरे यांच्याकडून जवळपास 18 लाख रुपये घेतले, तसेच संदीप पवार यांनी स्वतःच्या नावाने एक लाख रुपये आणि त्यांच्या मुलीच्या नावाने आणखी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. काही पैसे जीपी आणि रोकड देखील देण्यात आली आहे. याशिवाय प्रवीण नाईक नावाच्या व्यक्तीचाही या व्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले आहे. रजिस्ट्रेशन आणि इतर प्रक्रियेच्या नावाखालीही पैसे उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र बराच काळ उलटल्यानंतरही घराची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांनी घरमालक नारायण कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी नारायण कदम यांनी तुम्हाला माझ्याकडे घेऊन आलेले लोक फ्रॉड आहेत, त्यांच्या नादाला लागू नका,असे स्पष्ट सांगितले.

Advertisement

नक्की वाचा - प्रॉपर्टीसाठी नात्यांना तिलांजली; सख्ख्या भावासोबत केलं भयंकर कृत्य, 200 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उलगडा

त्यांनतर नारायण कदम यांनी घेतलेले ११ लाख रुपये परत दिले. मात्र राजू गावठे, संदीप पवार आणि प्रवीण नाईक यांनी घेतलेली रक्कम अद्याप परत मिळालेली नसल्याचे दीपक ठाकरे यांनी सांगितले. दीपक ठाकरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की, मुंबईत स्वतःचे घर असावे हे माझ्या पत्नीचे स्वप्न होते. त्यासाठी पत्नीचे दागिने विकले आणि जमेल ते सर्व पैसे या व्यवहारात लावले. मात्र आमची फसवणूक झाली. पोलिसांनी या प्रकरणात गंभीर दखल घेऊन मला न्याय द्यावा. तसेच, संदीप पवार यांनी म्हाडाच्या फाईल्स माझ्याकडे येतात असं सांगितलं होतं. त्यामुळे म्हाडा प्रशासनानेही या प्रकरणाची चौकशी करावी. माझ्यासारख्या अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे,असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात आता शिवडी पोलीस आणि म्हाडा प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.