
अमजद खान
ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांची दररोज फसवणूक होते. पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते. तरी देखील फसवणूकीचे प्रकार काही थांबत नाहीत. आत्ता तर एक पोलिसच ऑनलाईन फसवणूकीचा शिकार झाला आहे. बदलापूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणूकीच्या माध्यमातून जवळपास 13 लाखांचा गंडा घातला गेला आहे. या प्रकरणाची तक्रार प्रमोद कोळी या पोलिस कर्मचाऱ्याने तो कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्यात केली आहे. पोलीस आत्ता या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे एक पोलीसच फसवणूकीच्या जाळ्यात अडकल्याने या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात प्रमोद कोळी हे कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना ऑनलाईन धक्का बसला. कारण त्यांच्या बँक खात्यातून साडे चार लाख 27 हजार रुपये काढले गेले होते. इतकेच नाही तर त्यांच्या नावाने 8 लाख 90 हजार रुपयांचे जंम्बो लोन काढले गेले. प्रमोद कोळी यांनी एचडीएफसी बँकेत जाऊन या प्रकरणी चौकशी केली. सत्य कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. प्रमोद कोळी यांनी ही बाब त्यांच्या वरिष्ठांना सांगितली.
या प्रकणात बदलापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितले की, प्रमोद कोळी पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांची एकूण 12 लाख 69 हजार 600 रुपयांची फसवणूक झाली आहे. वास्तविक त्यांच्या एचडीएफसी बँकेतील खात्यातून 4 लाख 27 हजार रुपयांच्या मुदत ठेवी काढण्यात आल्या आहे. असे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचेपोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितलं.
ऐवढेच नाही तर त्यांच्या नावाने 8 लाख 90 हजार रुपयांचे जंम्बो लोन पास केले आहे. त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कोळीचा मेल आयडी काढून दुसरा मेल आयडी लिंक करण्यात आला होता. यातून हा सर्व घोळ झाल्याचा पोलीसांचा दावा आहे. त्यामुळे या मागे नक्की कोण आहेत. हे सायबर गुन्हेगार कोण आहेत याचा शोध पोलीसांना घ्यायचा आहे. त्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे एका पोलीसाला पोलीस कसे न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world