जाहिरात

Haris Ali : भाऊ-बहीण डॉक्टर, वडील मोठ्या कंपनीत; पण धाकटा भाऊ निघाला 'ISIS'चा हस्तक!

Haris Ali Arrest: हारिस हा एका अत्यंत सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा असल्याने या अटकेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Haris Ali : भाऊ-बहीण डॉक्टर, वडील मोठ्या कंपनीत; पण धाकटा भाऊ निघाला 'ISIS'चा हस्तक!
Moradabad bds student terror module : हारिस अलीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर कोणालाही विश्वास बसणार नाही...
मुंबई:

Haris Ali Arrest: एका बाजूला स्टेथोस्कोप घेऊन रुग्णांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला देशाला हादरवून टाकणाऱ्या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या घटनेला वर्षही पूर्ण होत नाही, तोच उत्तर प्रदेश एटीएसने मुरादाबाद येथून एका बीडीएसच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. हारिस अली असे या 29 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याचे संबंध थेट आयसिस (ISIS) या खतरनाक दहशतवादी संघटनेशी असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हारिस हा एका अत्यंत सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा असल्याने या अटकेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

सहारनपूरच्या मनकामऊ परिसरातील रहिवासी असलेला हारिस अली मुरादाबादच्या एका नामांकित कॉलेजमध्ये बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. उत्तर प्रदेश एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हारिस आयसिसच्या ऑनलाईन मॉड्यूलसाठी सक्रियपणे काम करत होता. त्याच्याकडून असे काही पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याचे आणि दहशतवादी संघटनेचे संबंध स्पष्ट होत आहेत. देशविरोधी कारवायांमध्ये एका डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाचा सहभाग आढळल्याने तपास यंत्रणा आता त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत.

डॉक्टर कुटुंब आणि उच्चभ्रू पार्श्वभूमी

हारिस अलीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर कोणालाही विश्वास बसणार नाही की असा मुलगा दहशतवादाच्या वाटेवर जाऊ शकतो. त्याचे वडील एका नामांकित आयटीसी (ITC) कंपनीत कार्यरत आहेत. त्याचे आजोबा आणि पणजोबा देखील याच कंपनीत मोठ्या पदावर होते आणि परिसरात मोठे जमीनदार म्हणून त्यांची ओळख आहे. हारिसचा मोठा भाऊ एमबीबीएस आणि एमडी झालेला डॉक्टर आहे, तर त्याची बहीण देखील सध्या एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. अशा सुशिक्षित घरात वाढलेला आणि स्वतः डॉक्टर होऊ पाहणारा हारिस देशविरोधी कृत्यात कसा काय सामील झाला, हा मोठा प्रश्न आहे.

( नक्की वाचा : Pune News: ओळखीच्याच तिघांनी 15 वर्षांच्या मुलीला बनवलं शिकार, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार )

दहशतवादी अदील अहमदशी कनेक्शन?

सहारनपूर जिल्ह्याला दहशतवादी कारवायांचा जुना इतिहास राहिला आहे. एटीएसच्या तपासात एक महत्त्वाची लिंक समोर आली आहे. काही काळापूर्वी अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉ. अदील अहमद हा हारिस अलीच्या घराजवळच भाड्याने राहत होता. 

अदील अहमदच्या अटकेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक उच्चशिक्षित तरुण दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचे समोर आले होते. हारिस देखील याच जाळ्यात ओढला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दहशतवादी संघटना आता अशा 'हाय-प्रोफाइल' आणि सुशिक्षित तरुणांना सॉफ्ट टार्गेट करत असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

( नक्की वाचा : Iran Israel War : फक्त 2 तासांची नोटीस अन् युद्धाच्या मैदानात भारतीय लेकीची एन्ट्री; वाचा थरकाप उडवणारी गोष्ट )

शेजारी आणि कुटुंबीय हादरले

हारिसच्या अटकेची बातमी समजताच त्याचे कुटुंब मुरादाबादकडे रवाना झाले आहे. त्याच्या घराबाहेर सध्या स्थानिक लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शेजाऱ्यांच्या मते, हारिसचे कुटुंब अत्यंत शांत आणि सुसंस्कृत आहे. तिन्ही भावंडे अभ्यासात हुशार असून हारिस कधीही कोणत्याही चुकीच्या संगतीत दिसला नव्हता. तो अभ्यासासाठी घराबाहेरच जास्त राहायचा. 

काही शेजाऱ्यांनी तर त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याची शंकाही व्यक्त केली आहे. मात्र, एटीएसने सबळ पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केल्याचे म्हटले असून पुढील चौकशी सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com