बीडमधून (Beed News) आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एचआयव्हीमुळे (HIV) एका मुलीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरल्याने गावकऱ्यांनी कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. अशी अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात या घटेनेने खळबळ उडाली आहे. एचआयव्हीच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. तर गावकऱ्यांनी कुटुंबासोबत व्यवहार करणे थांबवल्याचं पीडित कुटुंबाच म्हणणं आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ. ढाकणे आणि पोलीस कर्मचारी अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली असून यात पोलीस कर्मचारी काळे हा तुमच्या मुलीला एचआयव्ही होता अस सांगत आहे. तिच्या अंत्यविधीदरम्यान जे उपस्थित होते, त्यांची तपासणी करुन घ्या अशी भीतीही दाखवली. मुलीच्या सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. गावाने वाळीत टाकले आहे, कोणीही जवळ येत नाही, बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे. असं बोललं जात आहेत. त्यामुळे माझ्या पत्नीने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं.
आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाही. आता एचआयव्ही आहे या अफवेने घरातील मुलं देखील जवळ येत नाहीत. फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःख आलं आहे. आम्हाला न्याय द्या अशी मागणी कुटुंबाकडून केली जात आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिल्याने आमच्या कुटुंबाची बदनामी झाली. गावकऱ्यांना याबाबत सांगितल्याने लोक आम्हाला जवळ करत नाहीत. मुलीच्या सासरच्या मंडळाच्या सांगण्यावरून हे केल आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मुलीला एचआयव्हीने मृत्यू झाला अशी खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली असून गावकऱ्यांनी आम्हाला वाळीत टाकलं. कोणी भेटत नाही... जवळ येत नाही अशी आपबिती पीडित कुटुंबाने सांगितली.
एचआयव्ही संसर्गजन्य आजार नाही..
एचआयव्ही हा संसर्गजन्य आजार नाही. तर लैंगिक संपर्क किंवा रक्ताद्वारे हा आजार पसरतो. मात्र अद्यापही लोकांमध्ये गैरसमज आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णांबाबत गुप्तता पाळली जाते. डॉक्टरांनी अशा रुग्णांबाबत त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही माहिती देण्याची परवानगी नसते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world