मोसिन शेख, प्रतिनिधी
नागपूर हिंसाचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असताना आता बीडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात मशिदीतील फरशी फुटल्या तर भिंतीना देखील भेगा पडल्या आहेत.
गावातील दोन तरुणांनी हा स्फोट घडवून आणल्याचे समोर आले आहे. या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटात सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही.
नक्की वाचा - अपहरणापूर्वी देशमुखांनी चालकाला केलं होतं अलर्ट, शेवटचं वाक्य काय होतं? NDTV मराठीच्या हाती महत्त्वाचा जबाब
मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये संदलदरम्यान काही जणांमध्ये वाद झाला होता. या वादातून हा स्फोट घडविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विजय राम गव्हाणे, श्रीराम अशोक सागडे अशी आरोपींची नावं आहेत. त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
कशावरुन झाला होता वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी बीडमधील अर्धमसला गावात सय्यद बादशहा यांचा संदल कार्यक्रम होता. या संदलमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होत असतात. या संदरलमध्ये अर्धमसला आणि आजूबाजूच्या गावातील लोक संदल पाहण्यासाठी येत असतात. या संदलीत आरोपी विजय राम गव्हाणे, श्रीराम अशोक सागडे यांनी तक्रारदाराला जातीवाचक शिवीगाळ केली होती. यावेळी त्यांनी मशिदीबद्दलही काही वक्तव्यं केली होती. दोघांची समजूत काढल्यानंतर सर्वजण निघून गेले. यानंतर पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास मशिदीतून स्फोटाचा आवाज झाला होता. यावेळी आरोपी तेथून पळून जात असल्याचं दिसलं अशी माहिती पोलिसांच्या एफआयआरमध्ये नमूद केली आहे.
दरम्यान ATS पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक पोलीस त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती आहे.